श्रीकृष्ण भारूका यांचे पत्रकारितेतील योगदान महत्वाचे – डॉ. भगवान दिरंगे; श्रीकृष्ण भारूका यांना जयंतीनिमित्त अभिवादन

10

परतूर । प्रतिनिधी – स्व.पत्रकार तथा सा. भूकंपचे संस्थापक संपादक श्रीकृष्ण भारूका यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सोडविले.अतिशय प्रतिकूल परिस्थितीत साप्ताहिक चालवले. त्यामुळे पत्रकारितेत त्यांचे योगदान महत्वाचे आहे असे प्रतिपादन निवृत्त प्राचार्य डॉ. भगवान दिरंगे यांनी केले.सा. भूकंप कार्यालयात सोमवारी सायंकाळी शहरातील पत्रकारांच्या वतीने स्व.श्रीकृष्ण भारूका यांची जयंती साजरी करण्यात आली याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.
डॉ.दिरंगे पुढे म्हणाले की,स्व.श्रीकृष्ण भारूका यांनी समाजसेवा करता यावी या उदात्त भावनेतून पत्रकारितेचे व्रत स्विकारले. काही दैनिकांमधून परतूर प्रतिनिधी म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी सा. भूकंपचा श्रीगणेशा केला.कुठल्याही सुविधा उपलब्ध नसताना प्रतिकूल परिस्थितीत नियमित अंक काढले. सर्वसमावेशक लिखाण केले.त्याकाळी दर मंगळवारी प्रसिद्ध होणारे व जनसामान्य माणसाच्या समस्यांना वाचा फोडणारे साप्ताहिक अशी प्रतिमाच सा. भूकंपची तयार झाली होती.सा. भूकंपच्या माध्यमातून त्यांनी अनेक गोष्टींना न्याय दिला. मात्र जिथे चुकेल तिथे टीका केली. ताशेरेही ओढले.सर्वसमावेशक लिखाणामुळे त्यांचे सा. सर्वांना आपले वाटायचे.पत्रकारांमध्ये एकोपा राहावा यासाठी ते नेहमीच प्रयत्न करत.आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांनी पत्रकारिता केली. त्यामुळे पत्रकारितेत त्यांचे मोठे योगदान आहे.
कार्यक्रमाच्या प्रारंभी स्व. श्रीकृष्ण भारूका यांच्या प्रतिमेचे यथोचित पूजन करण्यात आले. यावेळी पत्रकार शिवकुमार भारूका, राजकुमार भारूका,अर्जुन पाडेवार,रमेश आढाव,बालाजी ढोबळे, भाऊसाहेब मुके,प्रा. डॉ. शरद बोराडे, आशिष गारकर,केदार शर्मा इतरांची उपस्थिती होती.
श्रीकृष्ण जयंती हा स्व. पत्रकार श्रीकृष्ण भारूका यांचा जन्मदिन आहे. हेच औचित्य साधून निवृत्त प्राचार्य डॉ. भगवान दिरंगे मागील 25 वर्षांपासून या कार्यक्रमाचे आयोजन करतात.भारूका यांचे 2010 मध्ये निधन झाले. परंतु त्यानंतरही डॉ. दिरंगे यांनी ही प्रथा कायम ठेवली आहे हे विशेष.