कसे सत्य सांगू, की मला माणसाची भीती वाटते रे… ‘श्रावण हिरवळ… कवितेचा दरवळ… कवि संमेलन रंगले

23

जालना । प्रतिनिधी – अंजनी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पोलीस उपनिरीक्षक बालाजी किरवले यांच्या मातोश्री स्व. अंजानी किरवले यांच्या 21 व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित ’श्रावण हिरवळ..कवितेचा दरवळ…’ हे निमंत्रितांचे कवि संमेलन बहारदार कवितांनी रंगले. एकापेक्षा एक सरस आणि तितक्याच आशयघन कवितांची बरसात झाल्यामुळे रसिक मंत्रमुग्ध झाले.
जालना शहरातील ब्राह्मण सभा भवनात गुरुवार, 22 ऑगस्ट रोजी सायंकाळी ’श्रावण हिरवळ..कवितेचा दरवळ…’ हे निमंत्रितांचे बहारदार कविसंमेलन पार पडले. या संमेलनाचे उदघाटन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव न्यायाधीश श्रीमती भालसाकडे वाघ यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस उपनिरीक्षक बालाजी बालाजी किरवले होते. यावेळी ज्येष्ठ विधीतज्ञ ब्रह्मानंद चव्हाण, जीवरेखा नदी समन्वय एम.डी.सरोदे, ओम हॉस्पिटलचे अर्जुन वाहुळे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.
या ठिकाणी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव भालसाकडे वाघ मॅडम यांनी मनोगत व्यक्त करताना महिलांचे हक्क कायदे व अधिकार या विषयी थोडक्यात माहिती दिली..
यावेळी कवि डॉ. सुहास सदावर्ते यांच्या
’कसे सत्य सांगू, कसे काय भांडू,
की मला माणसाची भीती वाटते रे..’
या आणि कवि कैलास भाले यांनी सादर केलेल्या
’पाऊस अवकाळी, विझवतो चूल
गळक्या घराला,अफूची भूल…’
या लघु कवितांना रसिकांना अंतर्मुख केले. डॉ. दिगंबर दाते यांनी सादर केलेली
’आभाळात गेलेला बाप आणता येत नसतो परत…
असताना कुठे कळतो तो, नसताना बसतो झुरत…’ या कवितेने रसिकांची दाद मिळविली. तर गझलकार डॉ. राज रणधीर यांच्या लयबद्ध गझलेने मंत्रमुग्ध केले. कवि पत्रकार अच्युत मोरे स्त्रीभ्रूणहत्येवर भाष्य करणारी
’उमलण्या आधीच कळी त्यांनी खुडून टाकली आहे..’ ही कविता सादर केली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक बालाजी किरवले यांनी हलाखीच्या परिस्थितीवर मार्मिक भाष्य करणारी
’माझी परिस्थिती होती कमालीची बिकट,
कव्हा असायचे तेलमीठ नसायचे तिखट..’ ही कविता गायली.
कवि पत्रकार विनोद काळे यांनी राजकारणावर टिप्पणी करणारी ’राजकारणाची पातळी’ ही कविता सादर केली.
कवयित्री ज्योती आडेकर यांनी ’उठ नारी तू शस्त्र उठा’ ही चेतना जागवणारी कविता सादर केली. कवयित्री रेखा
गतखणे, छाया जायभाये, वैशाली फोके, अनिता पाठे त्याचबरोबर गझलकार सुनील लोणकर, डॉ. प्रभाकर शेळके, ड अशोक खेडकर, गणेश खरात, कृष्णा कदम, मनिष पाटील, सुहास पोतदार, शिवाजी तेलंग, प्रा. पंढरीनाथ सारके,लक्ष्मीकांत दाभाडकर या कवींच्या बहारदार कवितांना रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. यावेळी उद्घाटक
न्यायाधीश भारसाकडे वाघ यांनी महिलांना कायदेविषयक माहिती देऊन उद्योग क्षेत्रात उतुंग भरारी घेणार्‍या उद्योगिनी महिलांना शुभेच्छा दिल्या. प्रस्ताविक ज्योती आडेकर यांनी केले.
सूत्रसंचालन मनीषा पाटील यांनी केले. विद्या जाधव यांनी आभार मानले.

उद्योगिनीचा सन्मान

यावेळी बचत गटाच्या माध्यमातून उद्योगक्षेत्रात उत्कृष्ट काम करणार्‍या बचत गटाच्या महिलांचा अंजनी फाउंडेशनच्या वतीने ’उद्योगिनी सन्मान – 2024’ हे मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
विद्याज्योत टेक्निकल एज्युकेशन सेंटरमध्ये संगणकाचे 12 महिन्यांचे शिक्षण पूर्ण करणार्या वैष्णवी एशल, वैष्णवी बावणे या विद्यार्थ्यांना मोफत संगणक देण्यात आले. यावेळी
सामजिक संदेश देणार्या ’फिक्र’ या शॉर्ट मूव्हीजच्या पोस्टरचे विमोचन करण्यात येऊन कलाकारांचा सत्कार करण्यात आला.