शांतिनिकेतन जालना शहराचे वैभव आता नर्सिंग मधूनही गुणवंत विद्यार्थी घडतील – विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

48

जालना । प्रतिनिधी – मागील अनेक वर्षांपासून मी पाहतो जालना शहरातून समर्थ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शांतिनिकेतन विद्यामंदिर ही शाळा गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी संस्था म्हणून आज सर्वपरिचित झालेली आहे. संस्थेचे अनेक संचालक उच्चशिक्षित व शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहेत. त्यामुळे शाळेचा गुणवत्तेचा दर्जाही चांगला असल्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितले.
जालना शहरातील शांतिनिकेतन नर्सिंग महाविद्यालयाचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, माजी आमदार संतोष सांबरे, जिल्हाप्रमुख ए.जे. बोराडे, उपजिल्हाप्रमुख बाबुराव पवार, शहरप्रमुख बाला परदेशी, घनश्याम खाकीवाले, दुर्गेश काठोटीवाले, वैद्यकीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ.राजेश राऊत, देवनाथ जाधव, महिला आघाडीच्या गंगुताई वानखेडे आदींची उपस्थिती होती. पुढे बोलतांना अंबादास दानवे म्हणाले की, या संस्थेचा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल सातत्याने सर्वाधिक आहे. या संस्थेला आता
नव्यानेच नर्सिंग अभ्यासक्रम सुरू करण्याची नुकतीच परवानगी मिळाली असल्याने आता आगामी काळात या महाविद्यालयातून गुणवंत विद्यार्थी घडतील यात कोणतीही शंका वाटत नाही. संस्थेचे अध्यक्ष भास्करराव अंबेकर यांनी ज्या-ज्या क्षेत्रात व पदांवर काम केले त्यात त्यांनी स्वतःला झोकून देऊन सर्वोत्तम काम केले आहे. आता त्यांच्या संस्थेने नव्यानेच नर्सिंग अभ्यासक्रमाला सुरुवात केली आहे. सूरू होत असलेला नर्सिंग अभ्यासक्रम म्हणजे काही कमाईची संधी नसून ती एक सेवेची संधी असल्याचे ते म्हणाले.
सर्वसामान्य महिला व नागरीकांना डोळ्यासमोर ठेवून नर्सिंग महाविद्यालयाची स्थापना -जिल्हाप्रमुख अंबेकर
यावेळी प्रास्ताविक करतांना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा संस्थेचे अध्यक्ष भास्करराव अंबेकर म्हणाले की, सर्वसामान्य महिला व नागरीकांना डोळ्यासमोर ठेवून या नर्सिंग महाविद्यालयाची स्थापना केली. अनेक पदव्या घेऊनही आज नोकरी मिळताना दिसत नाही. पण आरोग्य क्षेत्रात परिचारिकांची आवश्यकता मोठ्या प्रमाणावर असल्याचे दिसते. म्हणून नर्सिंग अभ्यासक्रम सुरू केला आहे. सदरील शिक्षण घेतल्यानंतर मुली-मुले लवकरच स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात. आतापर्यंत या अभ्यासक्रमाकडे जास्तीत जास्त ख्रिश्चन भगिनींचाच ओढा होता. पण या अभ्यासक्रमाचे महत्त्व आता सर्वस्तरातील महिलांच्या लक्षात आल्याने या अभ्यासक्रमाकडे येण्याचे प्रमाण वाढले आहे. संस्था याही अभ्यासक्रमाचे शिक्षण अत्यंत दर्जेदार देणार असल्याने सांगुन सर्वांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी केले.
यावेळी संदीप झारखंडे, संदीप नाईकवाडे, गंगुताई वानखेडे, पांडुरंग काळे, अनिल अंभोरे, सखावत पठाण, डॉ.राजेश राऊत, एन.डी.कडोस, जीवन खंडागळे, दर्शन चौधरी, गणेश लाहोटी यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी शिक्षक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.