जालना । अतिवृष्टीमुळे जालना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले असून जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत केली जाईल, अशी ग्वाही सहकार, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी दिली.पालकमंत्री यांनी आज अंबड व बदनापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना दिलासा दिला. पालकमंत्री यांनी बावनी पांगरी (ता. बदनापूर), हस्त पोखरी, सारंगपूर, सुखापुरी (ता. अंबड) या गावांना भेट दिली. काही भागात अतिवृष्टीमुळे वाहनाने जाणे शक्य न झाल्याने पालकमंत्री यांनी बैलगाडीतून पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी डाॅ. विजय राठोड, उपविभागीय अधिकारी संदिपान सानप, अंबडचे तहसिलदार विद्याचरण कडवकर, बदनापूरचे तहसीलदार श्री.मुनलोड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भीमराव रणदिवे, उपविभागीय कृषि अधिकारी शितल महाजन आदिंसह तालुका कृषी अधिकारी, ग्रामसेवक, मंडळ अधिकारी, तलाठी उपस्थित होते.
पाहणीनंतर अंबड येथील तहसील कार्यालयात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.पालकमंत्री अतुल सावे म्हणाले की, आज अंबड व बदनापूर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. मागील पंधरा दिवसांत अधिक पाऊस झाला, त्यामुळे पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले. शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर देण्यात आला. जिल्ह्यातील सर्व अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या पिकांचे ताबडतोब पंचनामे करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली असून पुढील दोन दिवसांत अहवाल शासनाकडे सादर करण्यास सांगण्यात आले आहे. जेणेकरुन हा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत ठेवून त्यावर तातडीने निर्णय घेऊन सरकारकडून आवश्यक ती आर्थिक मदत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिली जाईल.
शासन निर्णयानुसार सन 2017-18, 2018-19, सन 2019-20 या तीन आर्थिक वर्षापैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करुन कर्जाची नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत 50 हजार रुपयापर्यंत पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे. योजनेचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थ्यांनी आधार प्रमाणिकरण करणे आवश्यक आहे. त्यामुळे यादीमध्ये नाव असलेल्या लाभार्थ्यांनी आपल्या नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्राशी यादीतील विशिष्ट क्रमांक,आधार कार्ड, व बचतखाते पासबुकसह संपर्क साधून तातडीने आधार प्रमाणिकरण करुन घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
जालना जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत केली जाईल – पालकमंत्री अतुल सावे
नुकसानग्रस्त पिकांची पालकमंत्री यांच्याकडून पाहणी; नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करण्याचे दिले निर्देश