जालना । प्रतिनिधी – बदलापूर येथील त्या घटनेमुळे संपूर्ण देशाची मान शरमेने खाली गेली असून या प्रकरणी आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यायला हवा, तरच या घटनेबद्दल सरकारलाही थोडी फार का होईना आस्था आहे, असे वाटेल, असे राष्ट्रवादी काँग्रेस असंघटीत कामगार आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष रेखा तौर यांनी म्हटले आहे.
संघटनेच्या वतीने काल गांधी चमन येथे निषेध व्यक्त करुन निदर्शने करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस असंघटीत कामगार आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष रेखा तौर, लता जोशी, रेणुका सोनोने, पलवी महाले, निता वझरकर, कविता दाभाडे, मनकर्णा डांगे, गंगाबाई काळे, राजेंद्र जाधव, मुन्ना दायमा, अशोक काळे, लक्ष्मी वाघ आदींसह महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.
पुढे बोलतांना सौ. तौर म्हणाल्या की, बदलापूर येथील घटनेचा निषेध करावा तेवढा कमी आहे. महिलांवर होणार्या लैंगिक छळ, बलात्कार, हत्याप्रकरणी आरोपी विरुद्ध योग्य ती कडक कार्यवाही करावी तसेच महिलांना योग्य ते संरक्षण देण्यात यावे,गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, असे सांगून सौ. तौर पुढे म्हणाल्या की, बदलापूर शहरातील आदर्श विद्यालयात दोन चिमुकल्यांवर सफाई कर्मचार्याकडून झालेल्या अत्याचाराच्या क्रूर अमानुष घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) महिला कमिटीतर्फे गुरुवारी सकाळी गांधी चमन येथे आंदोलन करण्यात आले. गृहखाते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असून अशा निष्क्रिय माणसाने खरे तर स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे, लवकरात लवकर गुन्हेगारांना फाशीची शिक्षा द्यायलाच पाहिजे, अशी मागणीही यावेळी सौ. तौर यांनी केेली. कोलकता, बदलापूर, हैदराबाद अशा विविध ठिकाणी घडलेल्या अत्यंत दुर्दैवी आणि क्रूर बलात्कार व हत्या प्रकरणामुळे संपूर्ण देश अस्वस्थ आहे. या घटना फक्त बाहेरच्या राज्यातच होत नसून जालनाही या प्रकारासाठी अपवाद नाही. आज आपण सर्वजण 78 वा स्वातंत्र्य दिवस साजरा करत असतानादेखील महिलांना या प्रकरणातून स्वातंत्र्य मिळालेले नाही, ही खेदजनक बाब आहे. प्रशासनाचे प्रमुख म्हणून आपण या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी आणि संबंधित प्रकरणात न्याय मिळण्यासाठी आपल्या स्तरावरून आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी सौ. तौर यांनी केली. आ.राजेश टोपे व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख, शहर जिल्हाध्यक्ष नंदकिशोर जांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जालना युवा नेतृत्व युवक जालना शहर जिल्हाध्यक्ष राजेंद्र जाधव यांच्यावतीने निषेध आंदोलन करण्यात आले आहे.