आई -वडीलांच्या कष्टांची जाण ठेवून समाजाची सेवा करा – भास्कर अंबेकर

21

जालना । प्रतिनिधी- तुमच्या आई-वडिलांनी काबाडकष्ट केले. आपल्या पोटाला चिमटा घेऊन विपरीत परिस्थितीत शिक्षण दिले. तुम्ही त्याचे चीज केले पण तुमच्या निवडीचा कुटुंब व समाजाला आनंद झाला याची कायम जाणिव ठेवा. शासकीय नोकरीच्या माध्यमातून समाजाची सेवा करा. वंचितांना गरजवंतांना न्याय देण्याची भूमिका घ्या, असे प्रतिपादन शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी केले. जालना तालुक्यातील पिरकल्याण जवळील आनंदवाडी या दोनशे ते अडीचशे लोकसंख्या असलेल्या गावातील 14 युवकांची शासनाच्या विविध खात्यात निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या सत्कार समारंभ प्रसंगी बोलत होते. आनंदवाडी हे जालना तालुक्यातील छोटेसे गाव. गावात जाण्यास नीट रस्ताही नाही. कमी लोकसंख्या असल्यामुळे गावाकडे प्रशासनाचे कायम दुर्लक्ष. अशा या विपरीत परिस्थितीत गावातील 14 तरुणांनी पोलीस दलासह विविध शासकीय खात्यात नोकरीसाठी प्रयत्न केले, त्यात त्यांना यश मिळाले. गावकरी व परिसरातील नागरिकांना याचा प्रचंड आनंद झाला. करिता त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अनिरूद्ध खोतकर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख हरीहर शिंदे, प्रभाकर उगले, सरपंच सुरेश वाघमारे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर पुढे म्हणाले की, आपण ज्या समाजातून आलो त्या समाजावर आपण मिळालेल्या अधिकाराच्या माध्यमातून अन्याय करतो ही दुर्दैवी बाब आहे.सरकार आपल्याला पगार देते. परंतु शेतीच्या फेरासाठी जेव्हा त्याची अडवणूक केली जाते, पोलीस ठाण्यामध्ये अन्याय ग्रस्ताला न्याय देण्याऐवजी आर्थिक व्यवहारापोटी जेव्हा न्याय नाकारणारला जातो. यात अनेक अधिकारी शेतकरी कष्टकरी अशा वर्गातून आलेली असतात तेव्हा मात्र वाईट वाटते. लोकप्रतिनिधी ,नोकरदार या सर्वांनी जर ठरवलं तर सर्वसामान्यांना न्याय मिळताना,त्यांची कामे होताना अडचणी येणार नाहीत .करिता लोकप्रतिनिधी व व नोकरदारांनी फक्त आर्थिक फायद्याचा विचार न करिता निरपेक्ष भावनेने काम करून आपल्या आई-वडिलांचा नावलौकिक करावा असे सांगून जिल्हाप्रमुख अंबेकरांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर म्हणाले की ,भावी जीवनामध्ये आपल्या हातात पैसा येईल. त्यावेळी आपण चांगल्या मार्गाने आपले जीवन मार्गक्रमण करणे सोडू नये, व्यसनांपासून दूर राहावं. आपल्या शिक्षणासाठी- नोकरीसाठी खस्ता खाणार्या आपल्या आई-वडिलांची कुटुंबीयांची सेवा करावी व कुटुंबाचा आधार व्हावे .अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे आयोजन विशाल वाघमारे यांनी केले होते. या कार्यक्रम प्रसंगी शिवसेना उपतालुका प्रभाकर उगले, अल्पसंख्याक
उपतालुकाप्रमुख रोशन खाँ पठाण, बबनराव मिसाळ, पुंजाराम पवार, विष्णुपंत शिंदे, युवा सेना तालुकाप्रमुख संदीप मगर, उपविभाग प्रमुख उमेश शिंदे, प्रभाकर शिंदे, बंडू केळकर, माजी सरपंच संजय जाधव, माजी सरपंच सुरेशराव वाघमारे, माजी सरपंच माऊली पडूळ, ग्रामपंचायत सदस्य विलास हिवाळे, लाला भाऊ खरात, अंबादास खरात, रघुनाथ जाधव, अचित गाडेकर, रामेश्वर वाजे,नारायण चाळक, तुकाराम वाघमारे, अरबाज पठाण, उद्धव पडूळ,माधवराव गाडेकर, शिवाजी पडूळ, लक्ष्मण वाळुंज, भागवत वाळुंज, मारुती खरात, सचिन खरात, कैलास खरात, राहुल जोगदंड, बाबासाहेब गाडेकर यांच्यासह पिरकल्याण-आनंदवाडी व कल्याण प्रकल्प येथील यावेळी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होती. पोलिस दलात निवड झालेले युवक सुनिल जाधव, सतीश खरात, आकाश जाधव, राजेंद्र गाडेकर, योगेश खरात, सचिन गाडेकर, योगेश खरात, करण चाळक, आकाश शिंदे, शुभम वाजे आदींची उपस्थिती होती.