महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत प्रोत्साहन लाभ शेतकर्‍यांना 7 सप्टेंबरपर्यंत आधार प्रमाणिकरण करण्याचे आवाहन

120

जालना । प्रतिनिधी – महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत प्रोत्साहन लाभाची घोषणा शासनाने केली होती. या अनुषंगाने नियमित कर्जाची परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना रु. 50 हजार लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. जिल्हयातील 16 हजार 822 शेतकर्‍यांना प्रोत्साहन निधी मिळालेला आहे. मात्र अनेक कारणांनी आधार प्रमाणिकरण न झाल्याने 666 लाभार्थी शेतकरी अजूनही निधीच्या प्रतिक्षेत आहेत. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-2019 प्रोत्साहनपर लाभ योजने अंतर्गत प्रोत्साहनपर लाभास पात्र ठरलेल्या परंतु आधार प्रमाणिकरण न झालेल्या शेतक-यांसाठी महाआयटी यांनी दि. 7 सप्टेंबर 2024 पर्यंत आधार प्रमाणिकरणाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी योजनेस पात्र असलेल्या संबंधीत शेतकर्‍यांनी त्यांचे आधार प्रमाणिकरण करणे अत्यावश्यक व बंधनकारक असुन आधार प्रमाणिकरण करण्यासाठी ही अंतिम संधी आहे. आधार प्रमाणीकरणानंतर पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ होणार आहे. त्यासाठी शेतकर्‍यांना महा-आयटी मार्फत लघु संदेश (डचड) देण्यात आला आहे. तथापी, त्याबाबत सर्व बँकांनीदेखील संबंधीत सर्व शेतकर्‍यांना व्यक्तीशः कळविणे आवश्यक आहे. त्यानुसार योजने अंतर्गत विशिष्ट क्रमांकासह यादीमध्ये नाव समाविष्ठ असलेल्या परंतु अद्याप आधार प्रमाणिकरण न झालेल्या लाभार्थी शेतकर्‍यांसाठी आधार प्रमाणिकरणाची सुविधा सुरु करण्यात आलेली असुन आधार प्रमाणिकरण बाकी असलेल्या शेतकर्‍यांनी त्यांचे आधार प्रमाणिकरण दिनांक 7 सप्टेंबर 2024 पर्यंत पुर्ण करावयाचे आहे. त्यानंतर आधार प्रमाणिकरणाची सुविधा बंद होणार आहे. या कालावधीत आधार प्रमाणिकरण न केल्यास योजनेचा लाभ मिळु शकणार नाही. योजनेस पात्र असलेल्या शेतकर्‍यांची विशिष्ट क्रमांकासह प्रसिध्द झालेल्या यादीतील 666 शेतकर्‍यांनी त्यांचे आधार प्रमाणिकरण अद्याप पावेतो पुर्ण केलेले नाही.
आधार प्रमाणिकरण बाकी असलेल्या संबंधीत शेतकर्‍यांनी सदर योजनेच्या लाभासाठी मुळ आधारकार्ड व बचत खात्याचे पासबुक घेऊन संबंधीत बँकेत, सीएससी व आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन तातडीने आधार प्रमाणिकरण करुन घेण्याचे आवाहन सहकारी संस्थाचे जिल्हा उपनिबंधक परमेश्वर वरखडे, यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संबंधीत बँक शाखा, वि.का. संस्था कार्यालये तसेच तालुका उप/सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा, असे प्रसिध्दी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.