अंजनी फाऊंडेशनच्या वतीने जालना शहरात आज कविसंमेलन

4

जालना । प्रतिनिधी – येथील अंजानीआई बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेद्वारा संचालित अंजनी फाऊंडेशनच्या वतीने जालना येथे गुरुवार, 22 ऑगस्ट रोजी ’श्रावण हिरवळ…कवितेचा दरवळ…’ हे निमंत्रितांचे बहारदार कविसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. सायंकाळी 5 वाजता शहरातील गांधी चमन येथील ब्राह्मणसभा भवन या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
या कविसंमेलनात कवी, गझलकार डॉ. राज रणधीर, सुनील लोणकर, डॉ. प्रभाकर शेळके, डॉ. दिगांबर दाते, अशोक खेडकर, डॉ. सुहास सदावर्ते, कैलास भाले, गणेश खरात, विनोद काळे, कृष्णा कदम, मनिष पाटील, अच्युत मोरे, रेखा गतखणे, छाया जायभाये, ज्योती आडेकर, वैशाली फोके, सुहास पोतदार, शिवाजी तेलंग, प्रा. पंढरीनाथ सारके,अनिता पाठे या कवींच्या बहारदार कविता, गझल, इत्यादी काव्य प्रकाराने रसिकांना साहित्यिक मेजवानी मिळणार आहे.
अंजनी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पोलीस उपनिरीक्षक बालाजी किरवले यांच्या मातोश्री स्व. अंजानी किरवले यांच्या 21 व्या स्मृतिदिनानिमित्त हे कविसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाचे उदघाटन जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त अनंत कदम यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंजनी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पोलीस उपनिरीक्षक बालाजी किरवले हे राहणार आहेत. यावेळी संजीवनी हॉस्पिटलचे संचालक डॉ. बळीराम बागल, सामाजिक कार्यकर्ते शेख इब्राहिम, जीवरेखा नदी समन्वयक एम. डी. सरोदे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या बहारदार कविसंमेलनाचा साहित्य रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अंजनी फाऊंडेशनच्या सचिव विद्या जाधव, कोषाध्यक्ष विजय जाधव, विद्याज्योत टेक्निकल एज्युकेशन सेंटर आणि महिला संवाद परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
दहा बचत गटाच्या महिलांचा ’उद्योगिनी सन्मान’
बचत गटाच्या माध्यमातून उद्योगक्षेत्रात उत्कृष्ट काम करणार्‍या बचत गटाच्या महिलांचा अंजनी फाउंडेशनच्या वतीने ’उद्योगिनी सन्मान – 2024’ मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात येणार आहे. कविसंमेलनातील मान्यवरांच्या हस्ते हा सन्मान करण्यात येणार आहे. याच कार्यक्रमात विद्याज्योत टेक्निकल एज्युकेशन सेंटर मध्ये संगणकाचे 12 महिन्यांचे शिक्षण पूर्ण करणार्या विद्यार्थ्यांना मोफत संगणक वितरण करण्यात येणार आहे.