जालना । प्रतिनिधी – ज्याप्रमाणे सरकारने लाडक्या बहिणीचे फॉर्म भरुन घेऊन अनुदान अदा करण्याची तत्परता दाखवली, त्याचप्रमाणे निराधार आणि ज्येष्ठ नागरिकांचे फॉर्म भरुन घेऊन अनुदान वाटप करण्याची तत्परता दाखवावी. यासाठी विशेष मोहिम राबवावी, अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख यांनी केली आहे.
यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात श्री. देशमुख म्हटले की, राज्यात होवू घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने ’मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना प्रभावीपणे राबविण्यास सुरुवात केलीआहे. अल्पउत्पन्न गटातील महिलांसाठी ही योजना चांगलीच आहे. मतांवर डोळा ठेवून ही योजना राबविली असलीतरी दुसरीकडे ज्येष्ठ नागरिक, निराधार, अपंग हेसुध्दा मतदार नाहीत का? असा प्रश्न पडतो. सरकारने लाडक्या बहिणींचे फॉर्म भरुन घेण्यापासून ते अनुदान वाटपासाठी जी तत्परता दाखवली आहे, त्याचप्रमाणे निराधार, अपंग, ज्येष्ठ नागरिक हे पात्र असतील तर त्यांचेही फार्म भरुन घेवून अनुदान वाटप तत्काळ करावे, जेणेकरुन या मंडळींची दलालाच्या तावडीतून मुक्तता होईल आणि हे महायुती सरकार ’भेद’ करीत नाही, हेही स्पष्ट होईल; अन्यथा विशिष्ट हेतूने ही योजना राबविल्याचा राग ज्येष्ठ नागरिक, निराधार, अपंग यांच्यात निर्माण होवून हे मतदार दुखावतील हेही या सरकारने लक्षात घेणे गरजेचे आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी पात्र असणार्या निराधार, अपंग, ज्येष्ठ मंडळींचे फार्म भरुन घेण्यासाठी एक प तयार करावे व त्यातूनच त्यांचे फार्म स्वीकारुन अनुदान वाटप करावे, अशी मागणी श्री. देशमुख यांनी केली आहे. ज्येष्ठ मंडळी, अनाथ, अपंग, निराधार जनतेसाठीदेखील या मायबाप सरकारने आधार बनावे व योजना राबविताना भेदाभेद करीत नाही, हे दाखवून द्यावे, अशी मागणी श्री. देशमुख यांच्यासह अशोक पडुळ, संतोष कर्हाळे, सुभाष चव्हाण, अँड. शैलेश देशमुख, मंगेश मोरे, रविकुमार सुर्यवंशी, विठ्ठल गवारे आदींनी केली आहे.