जालना – जालना शहरातील संभाजी नगर येथे श्री चैतन्य टेक्नो स्कुल ही शाळा अनाधिकृत सुरु असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, त्यानूसार शाळेस शासनमान्यता नसतांनाही अनधिकृतपणे शाळा सुरु असल्याचा अहवाल प्राथमिक शिक्षणाधिकारी जालना यांनी दिला आहे. तरी संबंधित अनधिकृत शाळेच्या व्यवस्थापनास 1 लाख रुपये दंड ठोठावला आहे तसेच सुचना देवूनही शाळा बंद न केल्यास 10 हजार रुपये प्रतिदिन दंड ठोठावण्यात येणार आहे. असे निर्देश जालना पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी यांनी पत्रान्वये दिले आहेत.
शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची खबरदारी घ्यावी. शाळेतील प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश नजीकच्या शाळेत करावे, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. पालकांकडून घेतलेले प्रवेश शुल्क व शैक्षणिक शुल्क तात्काळ परत करावे तसेच दंडाची रक्कम तात्काळ भरण्याची सूचनाही शाळा व्यवस्थापनाला केली आहे. श्री चैतन्य टेक्नो स्कुल ही शाळा अनाधिकृत घोषित झाली असल्याचा 6×5 आकाराचा फलक शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ दर्शनीय भागात लावण्यात आलेला आहे. शाळेच्या प्रवेशद्वाराजवळील फलक फाडणार किंवा काढणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. असेही गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.