स्मशान भूमीत आवश्यक कामांना प्राधान्य दिले – आ. कैलास गोरंटयाल, लिंगायत वाणी समाजासाठी उभारलेल्या सभागृहाचे लोकार्पण

31

जालना । प्रतिनीधी – प्रत्येक मनुष्याच्या जीवनातील शेवटचा विसावा हा स्मशानभूमी असून त्या ठिकाणी आपण प्राधान्याने लक्ष घालून ज्या काही सुधारणा करता येईल त्या करण्याचा प्रयत्न केला असल्याचे प्रतिपादन आ. कैलास गोरंटयाल यांनी आज रविवारी येथे बोलतांना केले.
रामतीर्थ स्मशान भूमी परिसरात असलेल्या लिंगायत वाणी समाज स्मशान भूमीत आमदार स्थानिक विकास निधीतून सुमारे 25 लक्ष रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या सुसज्ज सभागृहाचे लोकार्पण आज रविवारी आ. कैलास गोरंटयाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. या कार्यक्रमास ज्येष्ठ विधीज्ञ मधुकरराव लिंगायत, उद्योजक वैजिनाथआप्पा लोणगावकर, प्रा.बसवराज कोरे, शंकरआप्पा सवादे, गणेशराव एलगुंदे, माजी सभापती महावीर ढक्का, श्रावण भुरेवाल, वाजेद पठाण, विनोद यादव, महेश एलगुंदे, बंडू परदेशी, कपिल भुरेवाल, पुरुषोत्तम सोसे, दत्ता पाटील घुले आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलतांना आ. कैलास गोरंटयाल म्हणाले की, सेवानिवृत्त अभियंता एस. एन. कुलकर्णी यांनी एक दिवस रात्री रामतीर्थ स्मशान भूमीत येण्याची विनंती केली होती. त्यानुसार त्यांच्यासोबत आपण एकदा रात्री 11 वाजता रामतीर्थ स्मशान भूमीत आलो होतो. त्यावेळी परिसरातील भटकी कुत्री प्रेताचे लचके तोडतांना आपण प्रत्यक्ष अनुभवले होते. सदर दृश्य मनाला सुन्न करणारे होते. त्याच वेळी आपण रामतीर्थ स्मशान भूमीचा पूर्णपणे कायापालट करण्याचा संकल्प करत सर्वप्रथम आमदार स्थानिक विकास निधीतून 5 लक्ष रुपये दिले होते. परंतु विकास आराखडा तयार करून त्यानुसार काम करण्याचा निर्णय ट्रस्ट मधील विश्वस्तांनी घेतला. मात्र, त्यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता असल्याने शहरातील विविध उद्योजक, व्यापारी, दानशूर, सामाजिक कार्यकर्ते आणि आमदार, खासदार निधीतून या स्मशान भूमीचा संपूर्ण कायापालट केला. पूर्वी दिवसा या भागात येण्यासाठी घाबरत होते मात्र, आज रात्री बेरात्री केव्हाही लोक येतात अशी परिस्थिती या स्मशान भूमीची झाली असून लोक देखील या कामाचं कौतुक करतात असे सांगून आ. गोरंटयाल म्हणाले की, कोणत्याही समाजाच्या स्मशान भूमीसाठी मदत करण्याला आपण नेहमीच प्राधान्य दिले आहे. रामतीर्थ स्मशान भूमीच्या परिसरात लिंगायत वाणी समाजासाठी सुसज्ज सभागृह उभारण्याचे आश्वासन आपण दिले होते. त्याची आज पूर्तता करतांना समाधान वाटते. सर्वसामान्य जनतेच्या आशिर्वादामुळेच आपण या पदावर असून त्यांच्यासाठी सकारात्मक काम करण्याला आपण नेहमीच प्राधान्य दिले. कुंभकर्णा सारखी झोप काढणारी काही मंडळी निवडणुका जवळ आल्या की, उद्घाटन करत फिरतात आणि विकास कामांचा पुळका दाखवतात. मात्र, अशा ढोंगी लोकांना जालना शहर आणि मतदार संघातील जनतेने चांगले ओळखले आहे. त्यामुळे कुणी कितीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तरी सुज्ञ नागरिक त्यांना भीक घालणार नाही असा विश्वास आ. कैलास गोरंटयाल यांनी यावेळी व्यक्त केला. प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. बसवराज कोरे यांनी केले. या कार्यक्रमास लिंगायत वाणी समाज बांधव आणि इतरांची मोठया संख्येने उपस्थिती होती.