जालना – जिल्ह्यात सद्यस्थितीत श्रावण सोमवार तसेच गणेश उत्सव व सणासुदीच्या दिवसांची सुरुवात होत असल्याने अन्न व औषध प्रशासनाकडून अन्न नमुने तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. तरी सण व उत्सवाच्या काळात जिल्ह्यातील अन्न व्यवसायिकांनी अन्न सुरक्षा व मानके कायद्याच्या तरतुदीचे पालन करावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाकडून प्रसिध्दीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
गणेश मंडळासाठी सुचना : अन्न प्रसाद वाटप करणाऱ्या गणेश मंडळानी https://foscos.fssa.gov.in या संकेतस्थळावरुन ऑनलाईन नोंदणी करुन घ्यावी. सदर नोंदणी प्रमाणपत्र तात्काळ ऑनलाईन देण्यात येईल. प्रसादामध्ये दुध किंवा खव्याचा वापर शक्यतो टाळावा दुध किंवा खव्याचे पदार्थ दोन तासापेक्षा जास्त वेळ सामान्य तापमानाला ठेवु नये. तसेच फळांचा वापर एका दिवसाच्या आत करावा. अन्न पदार्थ स्वच्छ जागी सावलीत झाकुन ठेवावेत. अन्न पदार्थ तयार करणा-या व वाटप करणा या भक्तांची वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी, आजारी असलेल्या भक्तांनी प्रसाद तयार व वाटप करु नये. प्रसाद तयार करणाऱ्या व वाटप करणाऱ्याभक्तांनी वैयक्तिक स्वच्छता पाळावी, नखे कापलेली असावी, तंबाखुजन्य पदार्थाचे सेवन करु नये. अन्न पदार्थ हाताळणी करताना हात स्वच्छ धुवुन प्रसाद वाटप करावे. प्रसाद तयार करण्याची जागा स्वच्छ असावी. पिण्याचे पाणी स्वच्छ असावे व हात व भांड्याचा वापर करण्यापुर्वी ते स्वच्छ धुवूनच त्याचा वापर करावा. प्रसाद बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल कुठुन आणला याची नोंद ठेवावी व बाजारातुन खरेदी केल्यारा न चुकता बिल घ्यावे.
व्यावसायिकांसाठी सुचना : अन्न परवाना,अन्न नोंदणी घेवुनच व्यवसाय करावा व अन्न परवाना, अन्न नोंदणीची प्रत दर्शनी भागात जनतेला दिसतील अशी प्रदर्शित करावी. मिठाईच्या ट्रेवर दर्शनी भागात सदर अन्न पदार्थ किती तारखेपर्यंत वापर करावाचा आहे याची माहिती द्यावी. कच्चे अन्न पदार्थ दुध, खवा, खाद्यतेल, वनस्पती आदि परवानाधारक अथवा नोंदणीकृत व्यवसायिकांकडुन खरेदी करण्यात यावेत. दुग्धजन्य पदार्थाची मिठाई आठ ते दहा तासाच्या आत खाण्याबाबत पॅकेटवर निर्देश देण्यात यावे. विक्रेता स्वच्छ कपडे घालून, हात नीट धुवून अन्न हाताळत आहे का, याची तपासणी करावी. अस्वच्छ हातामुळे अन्नात जंतूंची भर पडू शकते.
नागरिकांसाठी सुचना : मिठाई दुध व दुग्धजन्य अन्न पदार्थ खरेदी करताना अन्न परवाना, अन्न नोंदणी धारकाकडून खरेदी करावे अन्न पदार्थाचा वापर योग्य असल्याची तारखेची नोंद पाहुनच खरेदी करावे. उघड्यावरील अन्नपदार्थांपासून आरोग्याची काळजी घ्यावी. उघड्यावर ठेवलेल्या अन्नपदार्थावर धूळ, प्रदूषण, आणि कीटक बसण्याचा धोका अधिक असतो. असे अन्नपदार्थ खाण्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. शक्यतो ताजे, गरम, आणि स्वच्छ अन्न खाणे पसंत करा. उघड्यावर प्रदीर्घ काळ ठेवलेले अन्न टाळावे, कारण ते दूषित होण्याची शक्यता अधिक असते. उघड्यावर ठेवलेले अन्न खरेदी करताना, ते योग्यरित्या पॅक केले आहे का, हे पहा, अशाप्रकारे पॅकिंग नसलेले अन्न विकत घेणे टाळावे. उघड्यावर ठेवलेल्या अन्नपदार्थांमुळे पचनाच्या समस्या उदभवू शकतात. त्यामुळे असे अन्न खाल्ल्यानंतर पोटदुखी, उलट्या किंवा इतर पचनासंबंधी त्रास होऊ शकतो. सणांच्या दिवशी केलेले अन्न उरल्यास ते शक्यतो दुसऱ्या दिवशी गरम करून खाणे टाळावे. शिळे अन्न खाल्ल्यामुळे पचनास त्रास होऊ शकतो. अन्न बनवतांना आणि ते साठवताना स्वच्छतेच्या सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. स्वयंपाकघर आणि जेवणाचे भांडे स्वच्छ असणे महत्त्वाचे आहे. जेवणापूर्वी हात धुणे आवश्यक आहे. सणांच्या काळात उघड्यावर विकल्या जाणाऱ्या अन्न पदार्थाचे आकर्षण असले तरी, आरोग्याची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. या उपाययोजना लक्षात घेऊनच अन्न पदार्थाची निवड केल्यास, आपण उत्सवाचा आनंद सुरक्षितपणे घेऊ शकतो.
भाविकांसह नागरिकांनी मिठाई व दुग्धजन्य पदार्थ खरेदी करताना काळजी घ्यावी तसेच गणेश उत्सवानिमित्त विविध गणेश मंडळातर्फे प्रसाद, अन्नदान आदि कार्यक्रम ठेवण्यात येत असून सार्वजनिक उत्सव मंडळाचे पदाधिकाऱ्यांनी सुचनांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. असेही सहाय्यक आयुक्त, अन्न आणि औषध प्रशासन, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.