महसूल पंधरवाडानिमित्त आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न; आपत्ती काळात दक्षता घेण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

6

जालना – महसूल विभागामार्फत महसूल दिनापासून महसूल पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे. या अनुषंगाने सर्व विभागप्रमुख तसेच कर्मचार्‍यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आज आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन व रंगीत तालीम कार्यक्रम जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी अधिकारी-कर्मचार्‍यांना आपत्ती व्यवस्थापनाबाबत तज्ञांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ, उपजिल्हाधिकारी सरिता सुत्रावे, उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी मनोज काजळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात आपत्तीविषयक समस्यांवर कशा पध्दतीने मात करावी याबाबत रंगीत तालीम पार पडली. यावेळी स्वत: जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांनी तज्ञांकडून विविध उपकरणांची माहिती जाणून घेत उपस्थितांना आपत्ती काळात दक्षता घेण्याबाबत सूचना केली.

आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन कार्यक्रमात मार्गदर्शकांनी जिल्ह्यात अचानक उदभवलेल्या पूर परिस्थितीत काय करावे, काय करु नये तसेच यात्रा व गर्दीच्या ठिकाणी घ्यावयाची काळजी घ्यावी याची माहिती दिली. तसेच आग लागू नये म्हणून काय करावे, आग लागल्यास काय करावे आणि आगीनंतर काय करावे याची माहिती दिली. पावसाळ्यात अचानक पडणार्‍या विजा यावर प्रतिबंध, यामध्ये आकाशात विजा चमकत असल्यास विजेपासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी घ्यावयाची दक्षता काय घ्यावी. तसेच विजा कोसळताना काय काय कारावे, काय करु नये यासह सर्पदंशावर उपचार या विषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

आगीपासून बचाव करण्याबाबत मार्गदर्शन महापालिकेचे अग्नीशमन अधिकारी माधव पानपट्टे यांनी केले. दुसर्‍या सत्रात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात आगीपासून सुरक्षीततेसाठी रंगीत तालीम आणि आपत्ती व्यवस्थापन शोध व बचाव साहित्याचे प्रदर्शनही भरवण्यात आले. नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्ष 1077, रुग्णवाहिका 108/102, पोलिस नियंत्रण कक्ष 100 आणि अग्निशामक दल 101 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.