जालना । प्रतिनिधी – गेल्या वर्षी पावसाळ्यात अत्यंत कमी प्रमाणात पाऊस पडला होता. त्यात ऐन पावसाळी हंगामात जिल्हाभरात पावसाचा भाग बदलत सरासरी 20 ते 30 दिवसांचा खंड पडला होता. पाण्याअभावी सोयाबीन व कापूस यासह खरीप हंगामातील सर्वच पिके पाण्याअभावी सुकून गेली होती. यामुळे शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणावर पिकांचे झालेले नुकसान सहन करावे लागले होते. या परिस्थितीत महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा परतुर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी मंठा परतूर घनसावंगी आणि जालना या तालुक्यातील शेतकर्यांच्या शेतात जाऊन पिकांची पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना अर्थसहाय्य मिळवून देण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे जिल्हाधिकार्यांच्या दालनात बैठक घेऊन दुष्काळाने झालेल्या शेतकर्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकर्यांना अनुदान मिळवून देण्याकरिता राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना त्यावेळी जिल्हाधिकारी जालना यांना दिल्या होत्या. आमदार बबनराव लोणीकर यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी जालना यांनी जालना जिल्ह्यातील मंठा परतूर अंबड जाफराबाद भोकरदन घनसावंगी जालना या सर्व तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या नुकसान पीक क्षेत्राचे पंचनामे करून शेतकर्यांना शासकीय मदत होण्याच्या दृष्टीने अहवाल सादर केला होता. याबाबतीत आमदार बबनराव लोणीकर यांनीही नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी द्वारे सरकारची लक्ष वेधले होते. याबरोबर च आमदार लोणीकर यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजित दादा पवार कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना भेटून जालना जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून शेतकर्यांना अनुदान देण्याची मागणी केली होती. त्यामुळे शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी खरीप हंगाम 2023 मध्ये सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकर्यांना 2 हेक्टरच्या मर्यादेत प्रती हेक्टरी 5000 रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा शासनाने केली आहे.
ज्या शेतकर्यांनी खरीप 2023 मध्ये ई-पीक पाहणी द्वारे आपल्या पिकाची नोंद केलेली आहे, त्या शेतकर्यांना सदरचे अनुदान मिळणार आहे.
शेतकर्यांनी खरीप 2023 मध्ये ऑनलाइन ई-पिक पाहणी केलेली आहे अशा सोयाबीन पिकामध्ये वैयक्तिक शेतकर्याची जालना जिल्ह्याची संख्या 2,82,162 असून सामायिक खातेदार शेतकर्यांची संख्या 17,368 आहे. तसेच कापूस या पिकामध्ये वैयक्तिक शेतकर्यांची संख्या 2,19,688 असून सामायिक खातेदार क्षेत्र असलेल्या शेतकर्यांची संख्या 15,324 आहे. प्रति शेतकरी दोन हेक्टर मर्यादा या अनुदाना करिता असल्याने दोन हेक्टर क्षेत्र असणार्या प्रत्येक शेतकर्यांच्या आधार लिंक खात्यावर खात्यावर दहा हजार रुपये अर्थसहाय्य जमा होण्यास सुरुवात झाल्याने जालना जिल्ह्यातील शेतकर्यांमध्ये एक प्रकारे समाधानाचे वातावरण पसरले असून अनेक गावातील शेतकरी बांधव आमदार बबनराव लोणीकर यांचे आभार व्यक्त करताना दिसत आहेत.