मतदार नोंदणी शिबिरात सहभागी होऊन नोंदणी करा – आ. कैलास गोरंट्याल

41
जालना | प्रतिनीधी – आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात मतदार नोंदणीसाठी मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून या शिबिरात सहभागी होऊन नागरिकांनी जास्तीत जास्त मतदार नोंदणी करावी असे आवाहन जालन्याचे आमदार कैलास गोरंटयाल यांनी केले आहे.
अलीकडेच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत जालना शहरासह विधानसभा मतदार संघातील शेकडो मतदारांची नावे मतदार यादीतून परस्पर वगळण्यात आली असल्याचा प्रकार समोर आला होता. शिवाय एकाच कुटुंबातील मतदारांची नावे वेगवेगळ्या मतदान केंद्रांतील मतदार यादीत समाविष्ट करण्यात आल्याने मतदारांना मोठया प्रमाणात मानसिक त्रास होऊन त्याचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर देखील झाला होता. जालना शहर व विधानसभा मतदार संघातील मतदारांची वगळलेली नावं पुन्हा मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने विशेष मोहीम राबवावी अशी मागणी आ. कैलास गोरंटयाल यांनी जालन्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडे लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान केली होती. जालना जिल्ह्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यात मतदार यादीतून परस्पर मतदारांची नावे वगळण्यात आले  अशा स्वरूपाच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर भारत निवडणूक आयोगाने या तक्रारींची दखल घेऊन मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने दि. १० व ११ ऑगस्ट आणि १७ व १८ ऑगस्ट असे चार दिवस विशेष मतदार नोंदणी शिबीराचे आयोजन करण्यात आले असून उपरोक्त दिवशी आपल्या जवळच्या मतदार केंद्रावर जाऊन बी. एल. ओ. मार्फत मतदार नोंदणी, नावात दुरुस्ती, पत्ता बदल आदी बाबींची पूर्तता नागरिकांनी घ्यावी असे आवाहन आ. कैलास गोरंट्याल यांनी केले आहे.