जालना । प्रतिनिधी – शालेय जीवनातच वाहतूक नियमांची माहिती मुलांना झाली तर येणारी पिढी ही शिस्तबध्द व वाहतूक प्रिय तयार होईल आणि रस्त्यावरील अपघात कमी होतील. त्यासाठी शाळा व्यवस्थापन आणि पालकांनी विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांबाबत अवगत करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन भागीरथी ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक विकास काळे यांनी येथे केले.
इन्नरव्हील क्लब ऑफ जालना होरायझन आणि विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने येथील सेंटमेरी स्कूलमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक आणि वाहतूक नियम या विषयावर आयोजित कार्यशाळेत श्री. काळे बोलत होते. व्यासपीठावर स्कूलचे प्रिन्सिपल रेव्ह. फादर पत्रास, क्लबच्या अध्यक्ष ड.अश्विनी धन्नावत, सचिव ड. पिंकी लड्डा, ज्योती इगेवार, शिक्षिका सरिता पाखरे आदींची उपस्थिती होती.
यावेळी श्री. काळे पुढे म्हणाले की, शाळेच्या विद्यार्थ्यांची ने-आन करणारी व्हॅन आरटीओ मान्यताप्राप्त आहे का, बसण्याचे आणि उतरण्याचे नियम पाळले जातात का, सर्व सुविधा आहेत का, चढण्या आणि उतरण्यासाठी हेल्परचा वापर केला जातो का, प्रथमोपचार पेटी आहे का, याची शहानिशा शाळा, पालकांनीही करण्याची त्याबरोबरच योग्य ती दक्षता घेण्याची गरज आहे, असे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना रस्त्यावरील विविध सिम्बॉल, सिग्नल आदी वाहतूक नियमांची इत्यंभूत माहिती दिली.
याप्रसंगी ड. अश्विनी धन्नावत यांनी बाल न्याय मंडळासमोर येणारी अपघाताची प्रकरणे विशद करताना पुणे येथील अग्रवाल परिवाराच्या अपघातातचे उदाहरण दिले. लहान मुलांकडून होणार्या अपघातामुळे मोठ्यांना त्रास, शिक्षा कशी होऊ शकते याबाबत संवेदनशील केले. आजघडीला ट्युशनमुळे पालक सहावी- सातवीतील मुलांच्या हातात गाडी देतात. मात्र त्यांना वाहतूक नियमांबाबत आणि अपघातामुळे उद्भवणार्या दुष्परिणाबाबत जागरुक करत नाहीत. त्यामुळे अपघात घडल्यास मुलाच्या चुकीची शिक्षा पालकांना होते. ही बाब विचारात घेता मुलांच्या हातात गाडी देताना विचार करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षिका आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी वेदिका जोशी, प्रणव कानसे, धैर्य रांगोळे, रणवीर राठोड, सानिध्य रंजनकर, शौर्य अग्रवाल यांनी केले तर शेवटी उपस्थित आमचे आभार ओम दायमा आणि हर्षिता राजपूत यांनी मानले.