धनसिंह सूर्यवंशी यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान

14
जालना | प्रतिनिधी – महापुरुषांच्या विचारांना अनुसरून शेवटच्या घटकापर्यंत न्यायाची लढाई देणाऱ्यांसाठी साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे प्रबोधन समितीच्यावतीने दिला जाणारा समाजभूषण पुरस्कार हिंदू महासभेचे प्रदेश संघटन मंत्री धनसिंह सूर्यवंशी यांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला.
              साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे प्रबोधन समितीच्यावतीने अण्णाभाऊ साठे यांच्या 104 व्या जयंतीनिमित्त दि. 5 ऑगस्ट  रोजी जालना शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृहात आयोजित प्रबोधनात्मक कार्यक्रमात ‘मित्र वनव्यामध्ये’ कवितेचे प्रसिद्ध कवि, लेखक, गझलकार व प्रबोधनकार अनंत राऊत यांच्याहस्ते आणि संयोजक, आयोजक विकास यंगड, अमोल मिसाळ, समितिचे मार्गदर्शक सचिनराव क्षिरसागर, किरण शिरसाठ , विष्णु गवळी, संदिप खरात, अशोक पडूळ यांच्यासह पुरस्कारार्थी मातंग समाज प्रबोधन परिषदचे प्रमुख लहू भूषण संजय इंचे, समाजसेवक शिवराज जाधव, सी. के. डोईफोडे, साहित्यरत्न फेस्टिवलचे संकल्पक अंकुश राजगिरे, विद्रोही श्रीमंत संघटनेचे संदिप साबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत धनसिंह सूर्यवंशी यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
       धनसिंह सूर्यवंशी यांनी आतापर्यंत नागरी समस्यांवर वेळोवेळी आवाज उठवून जनतेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सोबतच सर्व जाती-जमातीच्या लोकांना एकत्र करून युवा पिढीस राष्ट्र, धर्म व संस्कृतीकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते सामाजिक समस्यांवर नेहमीच आवाज उठवितात. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
        यावेळी धनसिंह सूर्यवंशी म्हणाले की, समाज भूषण पुरस्कार मिळणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा क्षण आहे. आपण आजवर केवळ शांतता, बंधुत्व आणि  एकतेच्या शक्तीवर विश्वास ठेवून काम करत आलो आहे. आपण एकमेकांसाठी काहीतरी करू शकतो, जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवू शकतो, त्यांना न्याय मिळवून देऊ शकतो, यावर आपण ठाम असून, पुरस्कारामुळे आपणास ऊर्जा प्राप्त झाली आहे, असे सांगून या पुरस्कारासाठी निवड केल्याबद्दल त्यांनी डॉ. अण्णाभाऊ साठे प्रबोधन समितीचे आभार व्यक्त केले. पुरस्कार मिळाल्याबद्दल धनसिंह सूर्यवंशी यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.