जालना – राज्यातील गरीब कुटुंबांना वार्षिक तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यासाठी मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना राज्य शासनाने जाहिर केली आहे. या योजनेची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या सुचनेनुसार मंगळवारी (दि.6) अपर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याबरोबरच योजनेपासून कोणीही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही, याची दक्षता संबंधीतांनी घेण्याची सूचना श्रीमती मेत्रेवार यांनी केली.
बैठकीस जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर, सहा. जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. डी.एस. दिवटे, ऑईल कंपन्यांचे सेल्स ऑफिसर, गॅस एजन्सीचे प्रतिनिधी व तहसील कार्यालयांचे कर्मचारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वार्षिक तीन मोफत गॅस सिलेंडरचे पुनर्भरण तेल कंपन्यांमार्फत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
लाभार्थ्यांची पात्रता- या योजनेतंर्गत जिल्ह्यातील उज्वला योजनेचे लाभार्थी तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण (रिफिल) मोफत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. एका कुटुंबात (रेशन कार्डनुसार) केवळ एक लाभार्थी सदर योजनेस पात्र असेल. सदर लाभ केवळ 14.2 कि.ग्रॅ. वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅसधारकांना अनुज्ञेय
राहील.
कार्यपध्दती –सदर योजनेची सबसीडी लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरणाद्वारे (DBT) द्वारे जमा करण्यात येणार असल्यामुळे ई-केवायसी करणे आवश्यक आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती चौधर यांनी कळविले आहे.