जालना – शासनाने ई-पीक पाहणीची माहिती भ्रमणध्वनीमधील अॅपद्वारे गाव नमुना 12 मध्ये नोंदविण्यासाठी उपलब्ध करून देण्याचा पथदर्शी कार्यक्रम राबविण्याची कार्यपध्दती निश्चित केली आहे. राज्यामध्ये ई-पीक पाहणी प्रकल्प क्षेत्रीय स्तरावर महसूल व कृषी विभागाने संयुक्तरित्या राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या कार्यक्रमाची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरु झाली आहे. राज्य शासनाकडुन सन 2021 पासुन ई-पीक पाहणी नोंदणीस सुरुवात करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना मदत देताना ई-पीक पाहणी नोंदणी करणे बंधनकारक आहे. तरी मोबाईलद्वारे सर्व शेतकऱ्यांनी स्वत: ई-पीक पाहणीची नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे.
जिल्ह्यात दि. 1 ऑगस्ट 2024 पासुन खरीप हंगाम ई-पीक पाहणीची सुरुवात झाली आहे. खरीप हंगामाकरीता सुधारित मोबाईल ई- पीक पाहणी अॅप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. अॅपव्दारे शेतकरी त्यांचा पिकाचा पिकपेरा ई-पीक पाहणीद्वारे नोंदवू शकतील. सुरुवातीस ई-पीक पाहणी नोंदणी योजनेस शेतकऱ्यांचा कमी प्रतिसाद होता. परंतू जनजागृतीनंतर शेतकऱ्यांचा सदर योजनेस चांगला प्रतिसाद मिळत आहे. ई-पीक पाहणी प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या, अनुषंगाने सर्व तालुकास्तरावर प्रचार, प्रसार, प्रसिध्दी करण्यात आलेली आहे. तसेच शेतकऱ्यांना मोबाईल अॅपद्वारे ई-पीक पाहणीची नोंदणी करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले आहे. खरीप हंगाम ई-पीक पाहणी दि. 1 ऑगस्ट 2024 पासून दि. 15 सप्टेंबर 2024 पर्यत शेतकऱ्यांना नोंदणी करता येणार आहे. त्यानंतर तलाठी स्तरावरील पीक पाहणी नोंदणी सुरु होणार आहे. ती 15 आक्टोबर 2024 पर्यंत करता येणार आहे. मुदतीत जे शेतकरी ई-पीक पाहणी करु शकणार नाहीत त्यांना पीक विमा, पिक कर्ज, नुकसान भरपाई आदी सारख्या योजनांचे लाभ मिळण्यास अडचण निर्माण होऊ शकते. असे निवासी उपजिल्हाधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.