जालना – महसूल पंधरवाडा निमित्त जिल्ह्यातील सर्व आजी माजी सैनिक व अवलंबितांसाठी शनिवार, दि. 10 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11.00 वाजता सर्व तालुक्यांमध्ये आजी माजी सैनिकांसाठी “सैनिक हो तुमच्यासाठी” उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या दिवशी तहसीलदार व महसूल कर्मचारी आजी माजी सैनिकांच्या महसूल संबंधित कामे करण्यासाठी तहसीलदार कार्यालयात उपस्थित राहणार आहेत. त्यामध्ये पुढील प्रमाणे महसूल कामांचा समावेश असेल. शेतीच्या रस्त्यासंबंधी, घरकुल, इ) निवृत्ती वेतन नसलेल्यासाठी संजय गांधी निराधार योजना, निवृत्ती वेतन नसलेल्यासाठी श्रावण बाळ निराधार योजना, प्रलंबित फेरफार नोंदी, महसूल संबंधी इतर तक्रारी, शासनाच्या विविध योजनांची माहिती व मार्गदर्शन, राशन कार्ड, 7/12 इत्यादी संदर्भातील कामे.
वरील उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त आजी माजी सैनिकांनी व त्यांच्या अवलंबितांनी सर्व कागदपत्रांसह संबंधित तहसील कार्यालयात दिलेल्या वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन मेजर (डॉ) निलेश प्रकाश पाटील (नि.) जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.