जालना । प्रतिनिधी – जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील राज्य सरकारचं शिष्टमंडळ शनिवार (दि 3) रोजी एक वाजेच्या सुमारास मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी अंतरवाली सराटीत दाखल झाले. या शिष्टमंडळात भाजपचे आमदार राजाभाऊ राऊत, आमदार राणा जगजीत सिंह पाटील, आमदार नारायण कुचे आणि शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांचा समावेश होता.
288 जागांवर उमेदवार पाडायचे की उभे करायचे याचा निर्णय घेणार असल्याचा इशारा जरांगे यांनी दिला होता. त्यानंतर सरकारचं शिष्टमंडळ जरांगे यांच्या भेटीला अंतरवाली सराटीत आले होते. अंतरवाली सराटीचे सरपंच यांच्या घरी जरांगे यांची भेट झाली असून शिष्टमंडळ आणि जरांगे यांच्यात चर्चा झाली. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेवून चर्चा केली. या चर्चांमध्ये जरांगे यांच्या पूर्वीच्याच मागण्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी आम्हाला राजकारणात जायचं नाही म्हणून या शिष्टमंडळाला बोलावलं आणि सरकारला पुन्हा एकदा संधी देत आहोत. मात्र यांनी 13 ऑगस्टपर्यंत निर्णय घ्यायचा आहे. नसता आम्हाला 29 ऑगस्टला घोषणा करावी लागले असा इशारा जरांगे यांनी दिला आहे. सरकार आणि जरांगे यांच्या मध्यस्थी करून मराठा समाजाला न्याय कसा मिळेल याबाबात आम्ही प्रयत्न करत असल्याचं या शिष्टमंडळांनी सांगितले आहे.