जालना । प्रतिनिधी – विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य चांगले रहावे, यासाठी शाळेत समुपदेशक असणे अत्यंत गरजेचे आहे. ही जबाबदारी एखाद्या शिक्षकाने पार पाडावी. ज्या समस्या विद्यार्थी आपल्या घरच्यांना सांगू शकत नाहीत, त्या समुपदेशकाकडे मोकळेपणाने मांडतील आणि त्यामुळे विद्यार्थी तणावमुक्त राहतील म्हणजेच शाळांमध्ये समुपदेशन ही मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी महत्वाची पाऊलवाट ठरेल, असा विश्वास मानसोपचार तज्ञ डॉ. मानसी नोपाणी – मोरे यांनी येथे बोलताना व्यक्त केला.
मानसिक आरोग्य, त्याचे परिणाम आणि त्यातून बाहेर कसे पडायचे, या विषयावर इन्नरव्हील क्लब ऑफ जालना होरायझनतर्फे शुक्रवार दि. 2 ऑगस्ट रोजी सेंटमेरी स्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी आयोजित मार्गदर्शनपर कार्यक्रमात डॉ. मानसी नोपानी बोलत होत्या. अध्यक्षस्थानी स्कूलचे प्रिन्सिपल रेव्ह. फादर पत्रास, क्लबच्या अध्यक्षा ड. अश्विनी धन्नावत, सचिव अॅड. पिंकी लड्डा आदींची उपस्थिती होती. डॉ. नोपानी पुढे म्हणाल्या की, मानसिक आरोग्य म्हणजे आपल्या मनाची, भावनांची आणि वर्तनाची स्थिती असते. यामध्ये आपला ताण- तणाव व्यवस्थापन, जीवनातील आव्हानांशी जुळवून घेणे आणि निरोगी नातेसंबंध निर्माण करण्याची क्षमता समाविष्ट असून, मानसिक आरोग्य चांगले असणे म्हणजे जीवनाचा पूर्ण आनंद घेणे होय. लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. आपली कार्यक्षमता वाढवणे, ताण, चिंता आणि नैराश्य यांसारख्या समस्यांचा परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावर होऊ शकतो, त्यामुळे योग्य वेळेत उपचार आणि मानसिक आरोग्याची काळजी घेणे अत्यावश्यक आहे, असे त्या म्हणाल्या. मानसिक आरोग्य, त्यामुळे होणारे परिणाम व त्यातून वाचण्यासाठी करण्यात येणार्या उपायांबद्दल त्याचबरोबर सायबर गुन्हे, या प्रकारांना कसा आळा बसेल, याबाबतच्या उपाययोजना सांगून मोबाईल पाहण्याचा वेळ कसा ठरवावा, ताण-तनाव व्यवस्थापना वेगवेगळ्या ब्रीदिंग टेक्निक्स त्यांनी विद्यार्थ्यांना शिकवल्या. याप्रसंगी अॅड अश्विनी धन्नावत म्हणाल्या की, सामाजिक कार्य म्हणजे फार काही मोठे करावे, असे नव्हे. छोट्या छोट्या गोष्टीतूनही आपण सामाजिक कार्यात योगदान देऊ शकतो. दुसर्यांच्या चेहर्यावर हसू फुलविणे, आपल्या मित्रांना आणि आजूबाजूच्या जनतेला मदत करणे म्हणजेदेखील सामाजिक कार्य असे त्या म्हणाल्या. कार्यक्रमाला क्लबच्या सदस्य पुनम खंडेलवाल, पायल अग्रवाल, स्कूलच्या शिक्षिका संगीता इलाईस, प्राजक्ता चव्हाण यांच्यासह विद्यार्थी आणि शिक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन अर्णव कुलकर्णी आणि अनया निहाल यांनी केले तर उपस्थितांचे आभार सोनाली वाघ हिने मानले.