जालना । प्रतिनिधी – शासनाच्या विविध लोकाभिमुख योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करुन सर्वसामान्य जनतेला तत्परतेने या योजनांचा लाभ मिळवून द्यावा, यासाठी विभागप्रमुखांनी समन्वयाने काम करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी महसूल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केली.
महसूल पंधरवाडा दि. 1 ते 15 ऑगस्ट 2024 दरम्यान राबविण्यात येत आहे. महसूल दिनानिमित्त आज या पंधरवाड्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम महसूल भवन येथे पार पाडला. कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार, निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ, उपजिल्हाधिकारी सरिता सुत्रावे, पदमाकर गायकवाड, सविता चौधर, नम्रता चाटे, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भूजंग रिठे, आदींसह महसूल विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले की, महसूल विभाग हा प्रशासनाचा महत्वाी्चा विभाग म्हणून ओळखला जातो. जनतेला विविध सेवा देण्याबरोबरच महत्वासूच्या योजनांचा तत्परतेने लाभ देण्याचे काम या विभागामार्फत केले जाते. महसूल दिनानिमित्त महसूल पंधरवाड्यामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या पंधरा दिवसांत विविध उपक्रमांतून महसूल विभाग लोकाभिमुख व गतिमान करण्यासाठी अधिकारी-कर्मचार्यांनी चांगल्या पध्दतीने कार्य करुन उद्दिष्ट पूर्ण करावे.
प्रास्ताविक श्री. वायाळ यांनी केले. त्यांनी महसूल दिनाचे महत्त्व विषद करुन महसूल पंधरवाड्यात कोणती कामे करायची आहेत, याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतंर्गत निवड झालेल्या उमेदवारांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात नियुक्तीपत्र देण्यात आले. तसेच नवनियुक्त तलाठी, कोतवाल यांनाही प्रातिनिधीक स्वरुपात नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी अव्वल कारकून म्हणून पदोन्नती झालेल्या कर्मचार्यांचाही सत्कार करण्यात आला.