नागरिकांनी आपले आधार अद्यावत करावेत;  आधार अद्यावतीकरणासाठी विशेष मोहीम

155

जालना – भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाकडून प्राप्त निर्देशानूसार ज्या नागरिकांच्या आधार कार्डला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. अशा सर्व नागरिकांसाठी आधार कार्डवरील ओळखीचा पुरावा व पत्याच्या पुरावा अद्यावत करण्यासाठी दि.14 सप्टेंबर 2024 पर्यात विशेष मोहिम आयोजित करण्यात आली आहे. तरी  जिल्ह्यातील नागरिकांनी आपले आधार अद्यावत करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

जालना जिल्ह्यात जवळपास 56 आधार केंद्रे आहेत. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या 23 फेब्रुवारी 2023 च्या परिपत्रकानूसार माय आधार (https://myaadhaar.uidai.gov.in) पोर्टलव्दारे ऑनलाईन आधार कागदपत्रे अद्दावत करण्याकरीता पुढील 2 महिने 14 सप्टेंबर 2024 पर्यंत मोफत सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रणालीमध्ये ऑनलाईन आधार अद्यावत केल्यास नागरिकांना कोणतेही शुल्क दि. 14 सप्टेंबर 2024 पर्यंत लागणार नाही.  आधार कार्डवरील नोंद अद्यावत करण्यासाठी आपल्या जवळच्या आधार नोंदणी केंद्रावर केवळ 50 रुपये  शुल्क आकारण्यात येईल.  आधार क्रमांक हा व्यक्तीच्या ओळखीचा पुरावा म्हणून उदयास आला आहे. विविध सरकारी योजना आणि सेवांचा लाभ घेण्यासाठी आधार क्रमांकाचा वापर केला जात आहे. शासनाच्या विविध योजना आणि सेवांचा लाभ घेण्यासाठी सर्व नागरिकांनी आपले आधार वैयक्तिक तपशिलासह अद्यावत ठेवणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी www.uidai.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी. असे आधार नोडल अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी  सोहम वायाळ यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.