अखेर मूर्तीवेसचा रस्ता रहदारीसाठी होणार मोकळा..!

मूर्तीवेसला नुकसान न पोहचवता बाजूने 15 मीटर रस्त्यास वक्फ बोर्डाने दिले ना हरकत पत्र

805

जालना । गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेला मूर्तीवेसचा रस्ता अखेर रहदारीसाठी मोकळा होणार आहे. मूर्तीवेसला नुकसान न पोहचवता बाजूने 15 मीटर रस्त्यास वक्फ बोर्डाने पालिकेला ना हरकत पत्र देऊ केले आहे. अशी माहिती वक्फ बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी ‘जालना एक्सप्रेस’शी बोलतांना दिली आहे.

वक्फ बोर्डाने पालिकेस दिलेल्या पत्रात, मुर्तीवेसचे संरचनात्मक लेखा परिक्षण अहवालाप्रमाणे सदर वास्तुचे चार फुट उंची पर्यंत बांधकामाची स्थिती ही योग्य आहे. सदर प्रकरणी Maharashtra Ancient Monuments and Archaeological Sites and Remains Act , १ ९ ६० चे कलम २ ( १ ) मध्ये Ancient and Historical Monument या सदराखाली ही मिळकत येत असुन मिळकत ५० वर्षे जुने असल्याने तिचे जतन करणे , संरक्षीत करणे आणि लगतचा भाग तार, कुंपने किंवा इतर प्रकारे संरक्षीत करण्याची तरतुद आहे. त्याचप्रमाणे कलम ३ मध्ये अशा मिळकती Deemed to be protected Moument बाबत तरतुद आहे. त्या अनुषंगाने मुर्तीवेस हि मिळकत देखील पुरातन ऐतीहासिक वास्तु असुन तीचे संरक्षण / जतन होणे आवश्यक आहे. तरी मुर्तीवेसचे देखभाल दुरुस्तीचे कामे नगरपरिषद विकास निधीतून करण्यास आपणास नाहरकत प्रमाण पत्र दिलेले आहे. तसेच विभागीय आयुक्त औरंगाबाद यांच्या दालनात झालेल्या बैठकीच्या वेळी देखील नगरपरिषद जालना यांनी त्यांच्या आर्थिक तरतुदीतून विकास कामे करण्यास विनंती केलेली आहे. मुर्तीवेस भागातुन जालना नगरपरिषद मंजुर विकास योजनेनुसार १५ मिटर रुंद रस्त्याची आखणी केली असून सध्या जाय मोक्यावर सुमारे २५ ते ३० फुट रस्ता असुन उर्वरीत २० फुटासाठी भुसंपादन करावे लागणार असुन सदर भुसंपादन संदर्भात वक्फ मंडळाकडुन सहकार्य करण्यात येईल. या विकास योजना रस्त्यासाठी जालना नगर परिषद ही नियोजन विकास व भुसंपादन प्राधिकरण आहे. शहरातील विकास योजना रस्त्यांचे विकास करतांना नगर परिषदेने मामा चौक , मुंबा देवी मंदीर , महाविर चौक , सुभाष चौक , इ . ठिकाणी वाहतुक बेट तयार करून रस्ते विकसीत केले आहे . त्याच धरतीवर मुर्तीवेस येथील ऐतिहासिक वास्तुचे दोन्ही बाजुने रस्त्याचा विकास करून मुर्तीवेसचे जतन करणे शक्य आहे.

मुर्तीवेसचे जमिनीपासुन ४ फुट उंचीपर्यंतच्या मुळ बांधकामास हानी न पोहचविता उर्वरित धोकादायक भागाचे पुनर्बांधकाम करण्यास सहमती प्रदान करण्यात येत आहे. पुर्नबांधकाम करतांना वास्तुची मुळ प्रतिमा जशीच्या तशी ठेवण्याची दक्षता घेण्यात यावी. यावरील खर्च नगरपालिका निधीतुन भागविण्यात यावा. मुर्तीवेसच्या आसपासचे अनाधिकृत बांधकाम हटविण्यास या कार्यालयाची कोणतीही हरकत नाही. तसेच अतिक्रमण हटविल्यानंतर रस्त्यासाठी वक्फ मालमत्ता / जमीन संपादित करावयाची असल्यास याबाबतचा प्रस्ताव या कार्यालयास सादर करण्यात यावा. वक्फ अधिनियम, १९९५ मधील तरतुदीनुसार त्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे या पत्रात म्हटले आहे.