जालना – शासनाच्या महसूल विभागातंर्गत जिल्ह्यात दि. 1 ते 15 ऑगस्ट 2024 पर्यंतच्या कालावधीत महसूल पंधरवाड्यामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील तालुका तसेच उपविभागीय स्तरावरील आयोजित केलेल्या विशेष मोहीम, कार्यक्रम, उपक्रम, शिबीरे आणि महसूल अदालती आदि महसूल विभागाशी संबंधित कामकाजाचा नागरिकांनी वेळोवेळी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे.
महसूल सप्ताहात दि.1 ऑगस्ट 2024 रोजी महसूल दिन साजरा करणे व महसूल सप्ताह शुभारंभ व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे शिबीर, दि.2 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, दि.3 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री तिर्थ दर्शन योजना, दि.4 ऑगस्ट रोजी स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय, दि.5 ऑगस्ट रोजी सैनिक हो तुमच्यासाठी, दि.6 ऑगस्ट रोजी एक हात मदतीचा-दिव्यांगाच्या कल्याणाचा, आणि दि. 7 ऑगस्ट रोजी महसूल संवर्गातील कार्यरत तसेच सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचारी संवाद कार्यक्रम घेवून महसूल सप्ताहाचा समारोप करण्यात येईल. तसेच दि.8 ऑगस्ट 2024 रोजी गाव तेथे स्मशानभूमि, दि.9 ऑगस्ट रोजी फेरफार अदालत, दि.10 ऑगस्ट रोजी कमी जास्त पत्रके गाव दप्तरी नोंद घेणे, दि.11 ऑगस्ट रोजी शिवार फेरीचे आयोजन, दि.12 ऑगस्ट रोजी युवा प्रशिक्षण, दि.13 ऑगस्ट रोजी विविध दाखले वाटपासाठी शिबीर, दि.14 ऑगस्ट रोजी सेवा विषयक बाबी, प्रलंबित महालेखागार यांचे परिच्छेद निकाली काढणे तसेच दि.15 ऑगस्ट रोजी महसूल दिन पुरस्कार सोहळा आयोजित करुन महसूल सप्ताह, पंधरवाडा कालावधीत उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी महसूल दिन पुरस्कार सोहळा साजरा करण्यात येणार आहे.
पंधरवाड्यात महसूल विभागाने जिल्हास्तरीय महसूली कामे वेळेत पूर्ण करुन त्यानूसार अभिलेख अद्यावत करणे, वसूलीच्या नोटीसा पाठविणे, मोजणी करणे, अपिल प्रकरणांची चौकशी करणे, इ. कामे वेळेत व वेळापत्रकानुसार करणा-या अधिकारी व कर्मचारी यांचा तसेच महसूली वसुलीचे उद्दिष्ट पार करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार करणे तसेच महसूल विभागाने केलेल्या कामकाजाचा आढावा जनतेसमोर ठेवण्यासाठी दरवर्षी 1 ऑगस्ट हा महसूल दिन म्हणून जिल्ह्यात साजरा करण्यात येत असतो. महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या विविध शासकीय सेवा आणि इतर विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजना याबाबत जिल्ह्यातील नागरिकांना अधिकाधिक माहिती होण्यासाठी व त्याचा लाभ घेता यावा यासाठी, तसेच याबाबत नागरिकांमध्ये जागरुकता वाढावी, शासनाबद्दल आणि शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृध्दींगत व्हावा यासाठी विशेष मोहिम व लोकाभिमुख उपक्रम दि.1 ऑगस्ट 2024 या महसूल दिनापासून ते 15 ऑगस्ट 2024 या महसूल सप्ताह, पंधरवाड्यामध्ये राबविण्यात येणार आहेत. असे निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.