राज्यातील युवा वर्ग आपले शिक्षण पुर्ण करुन दरवर्षी मोठ्या संख्येने नोकरी, व्यवसायाच्या शोधात बाहेर पडत आहे. अशा बहुतांश युवकांना व्यवसाय व नोकरी संबंधित अनुभवाचा अभाव असल्याने व्यवसाय सुरु करणे अथवा नोकरी प्राप्त करण्यामध्ये अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे दिसून येते. या समस्येमुळे युवक वर्गामध्ये बेरोजगारीचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी अडचणी येत आहेत. विशेषतः यामध्ये बारावी उत्तीर्ण, कोणत्याही व्यवसायातील आय.टी.आय., पदविकाधारक, पदवी आणि पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण युवकांचा समावेश आहे. सद्यस्थितीत राज्यातील अनेक उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी उपलब्ध असली, तरी असे उद्योग व बेरोजगार युवकांना साधणारा दुव्यांचा अभाव असल्याकारणाने युवकांना शिक्षणानंतर अनुभवाअभावी पूर्णवेळ रोजगार मिळणे कठीण होत आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेला शासन निर्णयान्वये मान्यता प्रदान केली आहे. त्यामुळे आता शासकीय, निमशासकीय तसेच खाजगी आस्थापनांमध्ये युवक-युवतींना कार्य प्रशिक्षणाचा शिक्षणनिहाय विद्यावेतनासह लाभ घेता येणार आहे.
सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी क्रमांक प्राप्त करुन “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ घेता येणार आहे. बारावी उत्तीर्ण उमेदवारांना 6 हजार रुपये, आयटीआय किंवा पदविका उत्तीर्ण उमेदवारांना 8 हजार रुपये आणि पदवीधर उमेदवारांना 10 हजार रुपये विद्यावेतन दरमहा देण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी अद्यापपर्यंत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. तसेच यापुर्वी नोंदणी केली असल्यास महास्वयंम संकेतस्थळावर आपला 15 अंकी नोंदणी क्रमांक टाकून लॉगीन करावे आणि मोबाईल व आधार क्रमांक पडताळणी करुन विविध आस्थापनाकडील उपलब्ध रिक्तपदे व पात्रतेप्रमाणे मॅचिंग होणाऱ्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करावेत. योजनेसंदर्भात काही अडचण आल्यास सहाय्यासाठी कौश्ल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयात संपर्क साधावा.
- मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे स्वरूप :-
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतंर्गत प्रशिक्षणार्थी महिन्यातून 10 दिवस अथवा त्यापेक्षा जास्त दिवस गैरहजर असला तर, सबंधित प्रशिक्षणार्थीस त्या महिन्याचे विद्यावेतन अनुज्ञेय राहणार नाही. सदर प्रशिक्षणाचा कालावधी 6 महिने असेल. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना संबंधित आस्थापनेकडून प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे विहित नमुन्यातील प्रमाणपत्र देण्यात येईल. प्रशिक्षण घेत असलेल्या उमेदवारांना किमान वेतन कायदा, राज्य कामगार विमा कायदा, कामगार भविष्य निर्वाह निधी कायदा, कामगार नुकसान भरपाई कायदा व औद्योगिक विवाद कायदा लागू राहणार नाही. योजनेतंर्गत शिकाऊ उमेदवारी पूर्ण केलेले व करीत असलेले उमेदवार पात्र राहणार नाहीत. एका उमेदवारास या योजनेचा एकदाच लाभ घेता येईल. या कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थीना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेप्रमाणे शासनामार्फत विद्यावेतन दिले जाईल. विद्यावेतनामध्ये बारावी उत्तीर्ण उमेदवारांना दरमहा 6 हजार रुपये, आयटीआय किंवा पदविका उत्तीर्ण उमेदवारांना दरमहा 8 हजार रुपये आणि पदवीधर उमेदवारांना दरमहा 10 हजार रुपये विद्यावेतन दरमहा देण्यात येईल. विद्यावेतनाची रक्कम शासनाद्वारे प्रशिक्षणार्थ्यांना अदा करण्यात येईल. प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थींची दैनिक हजेरी संबंधित आस्थापना, उद्योग ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल. सदर ऑनलाईन उपस्थितीच्या आधारे प्रशिक्षणार्थीचे विद्यावेतन प्रशिक्षणार्थीच्या थेट बँक खात्यात ऑनलाईन पद्धतीने दरमहा अदा करण्यात येणार आहे.
- युवक-युवतींसाठी पात्रता :-
उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवासी असावा. उमेदवाराचे किमान वय 18 व कमाल 35 वर्ष असावे. उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण, आयटीआय, पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी असावी. मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेत सहभागास पात्र असणार नाहीत. उमेदवाराची आधार नोंदणी असावी. उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे. उमेदवाराने कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करुन रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा.
- आस्थापना, उद्योगासाठी पात्रता :-
आस्थापना, उद्योग महाराष्ट्र राज्यात कार्यरत असावा. आस्थापना, उद्योगाने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी. आस्थापना, उद्योगाची स्थापना किमान 3 वर्षापूर्वीची असावी. आस्थापना, उद्योगांनी ईपीएफ, ईएसआयसी, जीएसटी, सर्टीफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन, डीपीआयटी, व उद्योग आधारची नोंदणी केलेली असावी. या योजनेंतर्गत खाजगी क्षेत्रातील आस्थापना, उद्योजकाकडे एकूण कार्यरत मनुष्यबळाच्या 10 टक्के व सेवा क्षेत्रासाठी 20 टक्के इतके उमेदवार कार्य प्रशिक्षणसाठी घेता येतील. केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय, निमशासकीय या आस्थापना, उद्योग, महामंडळामध्ये मंजूर पदाच्या 5 टक्के इतके उमेदवार कार्य प्रशिक्षणासाठी घेता येणार आहेत. आस्थापना, उद्योगांनी त्यांच्याकडील कार्यरत मनुष्यबळाची माहिती अचूक दर्शविणे आवश्यक राहील. चुकीची मनुष्यबळ संख्या दर्शवून अथवा चुकीच्या पद्धतीने गणना करून या योजनेतंर्गत मनुष्यबळ उपलब्ध करून घेतल्यास त्यासाठी सबंधित कार्यालयाचा कार्यालय प्रमुख, प्राधिकृत अधिकाऱ्यास जबाबदार धरण्यात येणार आहे.
महाराष्ट्र शासनाने राज्यातील युवक-युवतीसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना नुकतीच सुरु केली आहे. याअंतर्गत राज्यातील 18 ते 35 वयोगटातील उमेदवारांना प्रत्यक्ष तांत्रिक प्रशिक्षण विनामुल्य देण्यात येणार असल्याने युवा सक्षमीकरण होण्यास मदत मिळेल यात शंका नाही. तरी या सुवर्ण संधीचा जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगारांनी लाभ घेणे आवश्यक आहे.