मुंबई । राज्यातील पशुधनावरील लम्पी चर्मरोगावर शासनाकडून मोफत औषधोपचार व लसीकरणाचे नियोजन करण्यात आले असून सर्व पशुपालकांनी स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्यांच्या पशुधनावर उपचार व लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे.
मंत्री श्री.विखे पाटील म्हणाले, लम्पी रोगाचा प्रसार माशा, डास, गोचिड इ. किटकांमार्फत होत असल्याने, तसेच मागील 10 दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे या किटकांच्या प्रजोत्पादनासाठी निर्माण झालेले पोषक वातावरण आणि पुढील आठवडाभर पाऊस पडण्याची हवामान खात्याने वर्तवलेली शक्यता लक्षात घेता ग्रामपंचायत व नगर परिषद अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात कीटनाशकांची फवारणी करावी. तसेच सर्व पशुपालकांमध्ये जनजागृती करावी.
लम्पी चर्मरोगावर उपयुक्त असणाऱ्या औषधींच्या उपलब्धतेसाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत प्रत्येक जिल्हयासाठी रू. १ कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निधीमधून लम्पी चर्मरोगावरील नियंत्रणात्मक लसीकरणासाठी खाजगी पशुवैद्यकीय व्यावसायिक, सेवादाता (व्हॅक्सीनेटर्स) व पशुवैद्यकीय महाविद्यालयातील आंतर्वासीता छात्र (ईंटर्नीज) यांना प्रति लसमात्रा रु. 5/- प्रमाणे मानधन देण्यात येणार असल्याची माहिती मंत्री श्री. विखे पाटील यांनी दिली.
सर्व खासगी पशुवैद्यकीय व्यावसायिकांनी, सेवादात्यांनी तसेच पशुसंवर्धन विभागातील आणि महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठातील सेवानिवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी स्वयंप्रेरणेने लसीकरण मोहिमेत सहभाग नोंदवावा. यासाठी त्यांनी संबंधीत जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयाशी संपर्क करावा. शासनाने खाजगी पशुवैद्यकांना लम्पी चर्मरोगाचा उपचार करण्यासाठी कोणतीही बंदी घातलेली नाही. शासकीय आणि खाजगी पशुवैद्यकांनी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने दि. 5 ऑक्टोबर 2022 रोजी दिलेल्या सुधारीत शिफारशींप्रमाणे उपचार करावेत असेही श्री विखे पाटील यांनी सांगितले.
राज्यामध्ये दि. 13 ऑक्टोबर 2022 अखेर 32 जिल्ह्यांमधील एकूण 2 हजार 568 गावांमध्ये लंपी चर्मरोग प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील एकूण 92 हजार 075 बाधित पशुधनापैकी एकूण 54 हजार 218 पशुधन उपचाराने बरे झालेले आहे. उर्वरीत बाधित पशुधनावर उपचार सुरु आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आज अखेर एकूण 140.97 लक्ष लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामधून एकूण 127.08 लक्ष पशुधनास मोफत लसीकरण करण्यात आले आहे. तसेच जळगांव, अहमदनगर, धुळे, अकोला, औरंगाबाद, कोल्हापूर, सांगली, वाशिम आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांमधील लसीकरण पूर्ण झाले आहे. खासगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांनी करून घेतलेले लसीकरण यांच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात सुमारे 90.82% गोवंशीय पशुधनाला लसीकरण झाले असल्याचे मंत्री श्री. विखे-पाटील यांनी सांगितले.