जालना । मानवी जीवन जगत असताना येणाऱ्या समस्यांवर उपाय शोधून जीवन सुकर करण्यासाठी नवसंशोधन हे गतकाळापासून अत्यंत महत्वाचे ठरले आहे. सर्वसामान्यांच्या समस्या लक्षात ठेऊन नवकल्पनेच्या माध्यमातून ग्राहक डोळयासमोर ठेवत सामान्यांचे जीवन सुकर होण्यासाठी उत्पादनांची निर्मिती व्हावी. तसेच स्वत:च्या उन्नतीबरोबरच देशाला अधिक समृद्ध करण्यासाठी नवकल्पनांचा उपयोग व्हावा, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी व्यक्त केली.
जेईएस महाविद्यालयाच्या सभागृहात महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेच्या जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबीर व सादरीकरण सत्राचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी डॉ. राठोड बोलत होते.
व्यासपीठावर उद्योजक सुनिल रायठठ्ठा, मॅजिक इन्क्युबेशन, औरंगाबादचे निखिल कुलकर्णी, उद्योजक प्रशांत तेलगड, प्राचार्य डॉ. जवाहर काबरा, डॉ. शिवनारायण बजाज, कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त संपत चाटे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड म्हणाले की, संपुर्ण महाराष्ट्रातील शहरी तसेच ग्रामीण भागामध्ये विशेष कौशल्य अंगी असणाऱ्यांची संख्या खूप आहे. परंतू केवळ व्यासपीठ उपलब्ध होत नसल्याने त्यांच्यातील सुप्तगुण समाजापर्यंत पोहोचत नाहीत. तरुणांमधील सुप्तगुण,कौशल्याला वाव मिळावा यासाठी शासनाने महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा हा उपक्रम सुरु केला आहे. जालना जिल्ह्यातील तरुण-तरुणी,नागरिक, महिलांमधील सुप्त गुणांना वाव मिळून नवसंशोधनाच्या माध्यमातून जिल्हावासियांच्या समस्यांवर मात करण्यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
गरज ही शोधाची जननी असल्याचे सांगत जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, शहरी भागातील नागरिकांच्या प्रवासाची समस्या लक्षात घेता त्यांचा प्रवास वेळेत व सुकर व्हावा यादृष्टीने तंत्रज्ञानाचा वापर करत अनेक प्रवासी वाहतुक कंपन्यांच्या नवसंकल्पना प्रत्यक्षात साकार झाल्या. त्याचा लाभ आज अनेक शहरांमध्ये नागरिकांना होत आहे. ग्रामीण भागामध्येही शेतीच्या कामासाठी मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ड्रोनद्वारे फवारणी ही नवसंकल्पना प्रत्यक्षात साकार झाली असुन मानवी आरोग्याचे दुष्परिणाम कमी होऊन वेळेत बचत या माध्यमातून होत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
उद्योजक सुनिल रायठठ्ठा म्हणाले की, अनेक देशांमध्ये स्टार्टअपलाला प्रोत्साहन देण्यात येत आहे. आपल्या देशासह राज्यात स्टार्टअपला प्रोत्साहन देऊन नवसंकल्पनांच्या माध्यमातून नवउद्योजक निर्माण करण्याचे काम करण्यात येत आहे. जिल्ह्यातील तरुण, तरुणींनी त्यांच्या नवसंकल्पनेसह पुढे येण्याची गरज व्यक्त करत नवीन उद्योजकांनी उत्पादन तयार करत असताना ते ग्राहकांच्या हिताचे व ग्राहकांना डोळयासमोर ठेऊन बनवावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
प्राचार्य डॉ. काबरा म्हणाले की, स्टार्टअपच्या माध्यमातून नवसंकल्पनांना वाव देऊन नवउद्योजकांना शासनाने एक संधी उपलब्ध करुन दिली आहे. या संधीचा नवउद्योजकांनी लाभ घेण्याचे आवाहन करत कौशल्यावर आधारित तसेच रोजगाराच्यादृष्टीने महाविद्यालयाच्या माध्यमातून सुरु करण्यात आलेल्या नवनवीन अभ्यासक्रमांची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कौशल्य विभागाचे सहाय्यक आयुक्त संपत चाटे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्र संचलन कैलास काळे यांनी तर आभार कनिष्ठ कौशल्य विकास मार्गदर्शन अधिकारी सुरेश बहुरे यांनी मानले.
देशाला अधिक समृद्ध करण्यासाठी नवकल्पनांचा उपयोग व्हावा- जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड
महाराष्ट्र स्टार्टअप यात्रांतर्गत जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबीर व सादरीकरण सत्राचे थाटात उदघाटन