जालना । शहरातील अर्चना नगरमधील पत्नीने दोन मित्रांच्या मदतीने पती अॅड. किरण लोखंडे यांची हत्या केली होती. या गुन्ह्यातील फरारी असलेल्या विकास गणेश म्हस्के या संशयितास सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोळाचा ओढा या परिसरातून ताब्यात घेत जालना पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
31 ऑगस्ट रोजी अँड. किरण लोखंडे यांचा मृत्यू झाला होता. यामध्ये घातपात असल्याचा संशय किरण लोखंडे यांच्या कुटुंबियांसह जिल्हा वकील संघाच्या वतीने व्यक्त करण्यात आला होता. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी जिल्हा वकील संघाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन केली होती. यानंतर पोलिसांनी तपास चक्रे वेगाने फिरवत आरोपी पत्नीची सखोल चौकशी केल्यानंतर हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 30 तारखेलाच आरोपी पत्नीने दोन साथीदारांच्या मदतीने अँड किरण लोखंडे यांची हत्या केली. त्यांच्या मृतदेहाला घरात पेटवून देत गॅसच्या स्फोटाचा बनाव केल्याचे तपासात समोर आले होते. या प्रकरणी पोलिसांनी मयत वकिलाची पत्नी मनीषा लोखंडे व साथीदार गणेश मिठू आगलावे यांना अटक केली होती. मात्र, एक आरोपी फरार होता. त्यास सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी जालना पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.