जालना-मणिपूर येथील महिला अत्याचाराच्या निषेधार्थ जालना शहरातील समस्त भारतीय ख्रिस्ती समाजाच्या वतीने गुरूवारी ( दि. 27)जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आली. वंचित बहुजन आघाडीने या धरणे आंदोलनास पाठिंबा दिला
ख्रिस्ती समाजाचे धर्मगुरू जगदीश चौधरी , रंजीत नेतनराव, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे, सचिव प्रशांत कसबे, जाॅर्ज शिंदे यांनी या धरणे आंदोलनाचे नेतृत्व केले.
मणिपूर येथील महिला अत्याचाराची घटना ही अमानवीय अशी आहे, माणुसकीला काळीमा फासणारी असल्याचे धर्मगुरू जगदीश चौधरी यांनी यावेळी सांगितले. धर्मगुरू रंजीत नेतनराव, सामाजिक कार्यकर्ते शैलेश घुमारे, रविराज सी. कांबळे, अब्राहाम घुमारे यांनीही मणिपूर येथील महिला अत्याचाराच्या घटनेचा निषेध करून या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केली.
तीन तास धरणे दिल्यानंतर समस्त भारतीय ख्रिस्ती समाजाच्या एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांची भेट घेऊन त्यांच्या हस्ते राष्ट्रपतींना सादर केले. या निवेदनात मणिपूर येथील महिला अत्याचार प्रकरणी मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
या धरणे आंदोलनात सिस्टर नंदा चौधरी, शामा रंजीत नेतनराव, निशा तांबे, धर्मगुरू चांगदेव भाकरे, विनोद विश्वकर्मा, सुधाकर पाटोळे, विलास खंडागळे, जाॅन हतांगळे, रविकांत दानम,सागर घुमारे, आकाश घुमारे,प्रशांत कांबळे, भोला कांबळे,सतीश गायकवाड, सचिन निर्मळ, धीरज पाखरे यांच्यासह ख्रिस्ती समाज बांधव, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
भाजपच्या काळात नरसंहार वाढला- घुमारे
मुघल व इंग्रजाच्या काळात कधी झाला नाही, एवढा नरसंहार भाजप व आर. एस. एसच्या काळात भारतात घडत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे यांनी यावेळी बोलतांना केला. मणिपूर येथील नरसंहारासह महिला अत्याचार प्रकरणाच्या घटनेस मणिपूर सरकारसह तेथील काँग्रेस नेतृत्वही तेवढेच जबाबदार आहे, मणिपूर येथील महिला अत्याचाराची घटना घडल्यानंतर तेथील काँग्रेस नेते गप्प का बसले, त्यांनी या प्रकरणी आवाज का उठविला नाही, असा सवालही घुमारे यांनी उपस्थित करून मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी महिला अत्याचाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. ख्रिस्ती समाजाच्या तरूणांनी सामाजिक अन्यायाच्या विरोधात रस्त्यावर उतरावे, असे आवाहनही घुमारे यांनी यावेळी केले.
——