जालना । महाराष्ट्रात बालकामगार विषयावर काम करणाऱ्या १२ जिल्ह्यातील ५५ स्वयंसेवी संस्था एकत्र आल्या आहेत. या संस्थांनी एकत्र येऊन अमरावती येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत राज्यस्तरीय नेटवर्क स्थापन केले. अपेक्षा होमीओ सोसायटीचे मधुकर गुंबळे यांनी या बैठकीचे नियोजन केले. या बैठकीस तेलंगणा येथील बालमजुरी विरोधात काम करणाऱ्या एम.व्ही.फौंडेशनचे व्यंकट रेड्डी, माजी मंत्री तथा आमदार बच्चु कडु यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रत्येक जिल्ह्यात या नेटवर्कच्या शाखा स्थापन करण्यात येणार असून बालमजुरी, शाळाबाह्य मुले बालविवाहावर काम केले जाणार आहे. शासनाने २० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय संदर्भात आवाज ऊठवणे, बालकामगार प्रकल्प पुन्हा कार्यान्वित करणे किंवा पर्यायी व्यवस्था निर्माण करण्या संदर्भात मागणी करणे, बालकामगारांची शासकिय आकडेवारीतील तफावत या साठी कायदेशीर मार्गाने लढा देणे, ऊसतीड कामगारांच्या पाल्यासाठी स्व. गोपिनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाच्या माध्यमातून संत भगवानबाबा निवासी वसतीगृह योजना अंमलबजावणी बाबत आवाज ऊठवणे असे अनेक ठराव या बैठकीत मांडण्यात आले. राज्यातील १२ जिल्ह्यातील समन्वयकांची निवड करण्यात आली.यात जालना आणि नंदूरबार जिल्ह्याचे समन्वयक म्हणून पुष्कराज तायडे यांची निवड करण्यात आली असुन राज्य निमंत्रक म्हणून डॉ.मधुकर गुंबळे यांची निवड झाली.
या परिषदेस आमदार बच्चू कडू, व्यंकट रेड्डी, ज्येष्ठ कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी, सूर्यकांत कुलकर्णी, हेमांगी जोशी, दीनानाथ वाघमारे, डॉ.किशोर मोघे यांनी बालकामगार निर्मूलन नेटवर्क ची आवश्यकता,उदिष्टे आणि पुढील वाटचाल यावर मार्गदर्शन केले. परिषदेत महाराष्ट्र लोकविकास मंचचे प्रतिनिधी तथा सीएआरडी संस्थांचे सचिव पुष्कराज तायडे,राष्ट्रीय बाल कामगार प्रकलपाचे माजी प्रकल्प संचालक मनोज देशमुख, ओमप्रकाश गिरी, दीपक नागरगोजे, बाजीराव ढाकणे, संजीव भारती, नितेश बनसोडे, महेश सूर्यवंशी, तुषार हांडे, अतुल मादावार किशोर चौधरी यवतमाळ, हरिष फडके, महेश पवार, मुकुंद आडेवार यासह अनेक महत्वाचे कार्यकर्ते उपस्थित होते.