शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का; निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह गोठवलं

143

नवी दिल्ली । शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गटाला निवडणूक आयोगाने मोठा धक्का दिला आहे. शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने तात्पुरत्या स्वरुपात गोठवले आहे. तसेच शिवसेना हे नावही उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे या दोन्ही गटांना वापरण्यास तूर्तास मनाई करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने हा तात्पुरता निर्णय घेतला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात होणाऱ्या पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरेंना धनुष्यबाण हे चिन्ह वापरता येणार नाही. हा निर्णय तत्परत्या स्वरुपाचा असून केवळ आगामी निवडणुकापूरता मर्यादित आहे. हा निर्णय बदलला देखील जाऊ शकतो. मात्र, आता उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे कोणतं चिन्ह निवडतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून जे चिन्ह शिवसेनेच्या अस्मितेशी जोडलेलं होतं, ते धनुष्यबाणाचं चिन्ह आता शिवेसेनेच्या हातातून निसटले आहे. निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीच्या तोंडावर हा तात्पुरता निर्णय देत हे चिन्ह गोठवलं आहे. त्यामुळे दोन्ही गटांना आता हे चिन्ह वापरता येणार नाही. शिंदे आणि ठाकरे गट या दोन्ही गटांचा या चिन्हावर दावा असणार नाही. सोमवारी दुपारपर्यंत नव्या चिन्हासाठी तीन पर्याय ठाकरेंना सादर करावे लागणार आहेत.