जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून आरोग्य केंद्रांची पाहणी

4 डॉक्टरांसह 16 कर्मचारी आढळले गैरहजर

100

जालना । जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांनी नुकतीच जिल्ह्यातील पाच आरोग्य केंद्रांना अचानक भेटी देवून पाहणी केली आहे. या पाहणीत दोन आरोग्य केंद्रातील 4 वैद्यकीय अधिकार्‍यांसह 16 कर्मचार्‍यांनी दांडी मारल्याचे समोर आले आहे.

काही दिवसांपूर्वीच जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मनूज जिंदल यांच्या संकल्पनेतून दांडीबहाद्दरांना चाप लावण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागात क्यूआर कोड स्कॅनिंगद्वारे दैनंदिन हजेरी घेण्याचा उपक्रम राबविण्यात आला आहे. प्राथमिक स्तरावर जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाच्या कार्यालयात हे क्यूआर कोड लावण्यात आले असून, इतर आरोग्य केंद्रांमध्येही हे क्यूआर कोड लावले जात आहेत. त्यातच आरोग्य सेवा आणि संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान पदाचा कार्यभार तुकाराम मुंढे यांनी स्वीकारताच आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचार्‍यांचे धाबे दणाणले आहेत. वरिष्ठांच्या सूचनेनुसार गुरूवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांनी माहोरा प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. त्यावेळी दोन्ही डॉक्टर हजर होते. औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सहायक व एक प्रयोगशाळा तंत्रज्ञ हे तिघे अनुपस्थित आढळून आला. मध्यरात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास डॉ. खतगावकर यांनी सोमठाणा आरोग्य केंद्राला भेट देवून पाहणी केली. त्यावेळी तेथील दोन्ही डॉक्टर अनुपस्थित होते. शिवाय आरोग्य सहायक, आरोग्य सहायिकाही अनुपस्थित असल्याचे दिसून आले.
दुसर्‍या दिवशी शुक्रवारी सकाळी 9 वाजता रामनगर शहरी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देण्यात आली. तेथे दोन्ही डॉक्टर गैरहजर दिसले. 8 आरोग्य सेविका, एक औषध निर्माण अधिकारी, एक संगणक ऑपरेटर अनुपस्थित दिसून आला. त्यानंतर सकाळी 10 वाजता कार्ला आरोग्य केंद्राला भेट दिली. तेथे एक डॉक्टर हजर होते तर एक दौर्‍यावर असल्याचे दिसून आले. एक परिचार आमावस्या पौर्णिमेला कार्यालयात येत असल्याचे समोर आले. त्यामुळे परिचराचे वेतन काढू नये, असे आदेश देण्यात आले आहेत. त्यानंतर रांजणी आरोग्य केंद्राची पाहणी केली असता सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित असल्याचे दिसून आले.