मद्यासक्ती एक आजार

विशेष लेख : शीला घरडे पाटील (मानसशास्त्र अभ्यासक) 9511270718

168
मद्यासक्ती एक आजार
सुरूवातीला एक ग्लास सहज घेतला जातो. नंतर आनंदासाठी. नंतर दुःख विसरण्यासाठी. नंतर ग्लास रिचवण्यासाठी कारण लागत नाही . नंतर नंतर ग्लास रिचवला नाही तर अस्वस्थता वाढते .आणि मग हाच सहज घेतलेला एक ग्लास सवय बनते .आणि त्यानंतर हा एक ग्लास व्यक्तीलाच गिळून टाकतो.
मद्य सेवनाने वर्तन बदल होतो. विशेषत: तो वर्तनबदल आक्रमक स्वरूपाचा असतो.
१)आईला मारू नका म्हणणा-या आठ वर्षीय मुलीवर मद्यपी पित्याने गोळी झाडली .
२)दारू पिऊन का आलात ? अशी विचारणा करताच मद्यधुंद पतीने पत्नीला वीट मारून फेकली.
३)दारूला पैसे दिले नाहीत म्हणून व्यसनाधीन मुलाने वृद्ध वडिलांच्या डोक्यावर पाण्याने भरलेला लोटा फेकून मारला .
४)दारूसाठी पैसे न दिल्याने मुलाने वृद्ध आईचा जीव घेतला.
वर्तमानपत्रातून उजेडात आलेल्या ह्या बातम्या आहेत . यामध्ये एक व्यक्ती मद्यपान करतो.त्याला क्षणिक सुख मिळते. परंतु आई-वडील, मुले ,पत्नी या सर्वांचे मानसिक स्वास्थ्य /शारीरिक सुरक्षा धोक्यात असते .प्रसंगी निष्पाप जीवांचा बळी जातो .मुलांच्या भविष्यावर त्याचे दुष्परिणाम होतात. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मद्यपी व्यक्तीच्या पत्नीचे आयुष्य वेदनामय बनते.
केस- १) मद्यपीची  पत्नी सांगत होती,”मी रोज शेतात कामाला जायचे. शेतातून घरी आल्यावर घर काम करत होते.पण रात्रीची झोप सुखाची  मिळेल की नाही याचा धाक असायचा मनात .नवरा रोज दारू प्यायल्यावर अर्ध्या रात्रीपर्यंत बडबड करत होता. त्याच्या गोष्टी ऐकल्या नाही तर शिव्या द्यायचा. कधी कधी  मारायचा सुद्धा. त्याच्या आधी जेवण केले तर पुन्हा त्याच्यासोबत जेवायला लावायचा. सोबत जेवण नाही केले तर जेवण फेकून देत होता. एक दिवस तर सोबत का जेवत नाहीस ? म्हणून भाजी असलेल्या पातेल्यात  त्याने लघवी केली.या सर्व त्रासापाई त्याच्यासोबत झोपण्याची इच्छा होत नसे.आणि जर त्यासाठी मी नकार दिला तर , म्हणायचा की तुझा कोणी यार असेल म्हणून तर तू माझ्यासोबत झोपत नाहीस.  तो  माझ्यावर संशय घ्यायचा. माझा जीव संध्याकाळ झाली की  नुसता धडधड करायचा.की पुढच्या क्षणी काय होईल?. असा त्रास मी दहा बारा वर्षे सहन केला .एक दिवस मात्र त्याने आमच्या झोपलेल्या मुलीला बायको समजून स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी त्याला घडलेला प्रकार सांगितला तर त्याला तो आठवत नाही म्हणाला.मी तसे केलेच नाही म्हणाला.म्हणून मी  मुलीसह त्याचे घर सोडले”
केस -२ )मध्ये .. एक मद्यपी बाथरूम पर्यंत जातो. बाथरूमच्या दाराला हात लावतो .आणि घरात येऊन लघवी करतो. बाथरूमच्या दाराला पुन्हा हात लावतो व बेडवर येऊन झोपतो .दुसऱ्या दिवशी त्याला तो प्रसंग आठवत नाही.
दोन्ही केसमधील व्यक्तींना घडलेला प्रकार आठवत नाही. घडलेला प्रसंग ते नकारतात.
दीर्घकाळ अतिमद्य सेवन केल्याने शरीराच्या बऱ्याच अवयवावर परिणाम होतो. जसे यकृत.मद्य सेवनाचा  मेंदूवर व स्मृतीवर तात्पुरता परिणाम तर होतोच परंतु दीर्घकाळ मद्य सेवनाने स्मृतिलोप देखील घडून येऊ शकतो .दीर्घकाळ मद्य सेवनामुळे निर्माण होणाऱ्या या स्मृतिलोपास ‘कोरसॅकॉफ संलक्षण’  असे म्हणतात .असे झाल्यास व्यक्ती बऱ्याच वेळेस खोटं बोलताना आढळते .खरं तर ती व्यक्ती खोटं बोलत नसून स्मृती मधील पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न करीत असते. ज्यास ‘स्मिथ्यारचना’असे म्हणतात. हे मद्यासक्त व्यक्तीच्या आहारात प्रदीर्घकाळ vitamin B च्या अभावाने निर्माण होते. ‘कोरसॅकॉफ डिसऑर्डर’ हा मेंदूतील memory system वर परिणाम करतो .यालाच korsakoff’s amnesic syndrome सुद्धा म्हणतात.
आनंदासाठी मद्य सेवन ,दुःख दूर करण्यासाठी मद्य सेवन, सहज मद्यसेवन ,, रोजगार नाही म्हणून मद्य सेवन, अतिरिक्त पैसा आहे म्हणून मद्य सेवन, बायकोचा त्रास आहे म्हणून  मद्य सेवन, बायको नाही म्हणून मद्य सेवन,मुलांचा त्रास आहे म्हणून मद्य सेवन, मुलं नाहीत म्हणून मद्य सेवन,कारणे काहीही असली तरी एका व्यक्तीबरोबर संपूर्ण कुटुंबाला त्रास सहन करावा लागतो. मद्यपि व्यक्तीच्या त्रासाची सर्वात जास्त झळ सोसावी लागते ती त्याच्या पत्नीला .
मद्य सेवनाचा मेंदूवर  किंवा स्मृतीवर जसा परिणाम होतो तसा त्याच्या लैंगिक प्रेरणेवर देखील परिणाम होतो. त्यामुळे पुरुषाची जननक्षमता कमी होते .वंध्यत्वाची समस्या येते. पुरुषाच्या लैंगिक प्रेरणेवर परिणाम झाल्याने स्त्रीचे लैंगिक जीवन संपुष्टात येते. तिची लैंगिक उपासमार होते . त्यामुळे तिच्यामध्ये अनेक शारीरिक – मानसिक समस्या निर्माण होऊ शकतात.
याशिवाय घरातील अशा वातावरणाने घरातील  मुलांच्या व्यक्तिमत्त्वावर त्याचा विपरीत परिणाम होतो .मुलांना घरात असुरक्षित वाटायला लागते .ते सतत भयाच्या सावटाखाली वावरत असतात  . या विषयीच्या अभ्यासाचा निष्कर्ष  असे सांगतो की,’मद्यासक्तीचे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमण होते’. मद्यपी व्यक्तीच्या मेंदू पेशींमध्ये बदल होतो किंवा त्या मृत पावतात. स्मृती प्रक्रियेमध्ये अडथळे अडथळे येतात.
पोट ,आतड्यांमध्ये रक्तस्त्राव होऊ शकतो. प्रतिकार यंत्रणा कमजोर होऊन रोग संसर्गाच्या विरुद्ध लढणाऱ्या पेशींच्या कार्यात बिघाड होतो .मद्याचा दुरूपयोग हा सुखद परिणामांमुळे सुरू होतो .शेवट मात्र दु:खदच असतो .मद्यपान करणे हा इतर शारीरिक अवयवांच्या आजाराप्रमाणे मेंदूचा आजार आहे .हातापायाच्या ,पोटाच्या किडनीच्या,ह्रदयाच्या आजारावर जसे उपचार घेतले जातात तसे मद्यासक्तीवर देखील मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार करून घेणे गरजेचे असते. चिकित्सकाच्या कक्षेपर्यंत न पोहोचलेल्या मद्यपानाच्या प्रकारास ‘समस्यायुक्त’ मद्यप्राशन (Problem Drinking) म्हणतात. ही व्यक्ती सुरुवातीला चिकित्सकाकडे न गेल्यास मद्याधिन (Alcohol Dependent)  बनते. त्यामुळे शारीरिक बिघाडा बरोबरच वर्तनात्मक बिघाड देखील होतो .बुद्ध या मानसशास्त्रज्ञाने व्यक्तीला जीवन मार्ग सांगताना ‘मद्यपान करू नये’ असे सांगितले .कारण  एका व्यक्तीच्या मद्यपानाने  संपूर्ण कुटुंबात दुःख निर्माण होते . व्यक्तीच्या  आर्थिक, सामाजिक ,मानसिक, नैतिक  ,कौटुंबिक असा एकूणच विचार बुद्धांच्या एका वाक्यामागे होता .    
  शारीरिक आजारांपेक्षा मद्यासक्ती या मेंदूविकार ग्रस्तांची संख्या अधिक आहे. कोरोना काळात दारूची दुकाने बंद होती. आणि ती उघडल्यानंतर त्या दुकानात समोर कितीतरी किलोमीटरपर्यंत  रांगा होत्या. अन्न ,वस्त्र या अत्यावश्यक गरजेच्या वस्तूंसारखी दारूची साठवण लोकांनी करून ठेवली होती. पिशव्या घेऊन लोक रांगेत उभे होते.त्यातील काही लोकांनी चक्क सांगितले की आम्हाला दीड-दोन महिन्यांपासून झोप येत नव्हती . यावरून मद्याधिनता लक्षात येते .त्या रांगा आपण पाहिल्यात. परंतु रांगेच्या बाहेर अदृश्य रांगांची संख्या देखील लक्षणीय आहे.
मद्यपाना संबंधी अभ्यास करणारे संशोधक इ.एम. जेलिंक म्हणतात ,”सर्वसामान्य जीवन जगण्यासाठी मद्यासक्त व्यक्तीने संयम बाळगणे हाच हाच मार्ग असतो”.
                         शीला घरडे पाटील
(मानसशास्त्र अभ्यासक) 9511270718