जालना । ग्रामीण भागातील पत्रकारांसाठी जिल्हातंर्गत मोफस बस प्रवासासाठी बस पास देण्यात यावे अशी मागणी प्रेस कॉन्सील ऑफ महाराष्ट्र जालना जिल्ह्याच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्याबाबतचा ठराव जिल्हा पदाधिकार्यांच्या वर्षपुर्ती निमित्त आयोजित बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला. गुरुवार (दि 07) रोजी पार पडलेल्या बैठकीत जिल्हा सरचिटणीसपदी दर्पण जैन यांची तर जिल्हा उपाध्यक्षपदी प्रा. दत्ता देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच जाफराबाद तालुकाध्यक्षपदी शेख अशफाक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रसंगी जालना सरचिटणीस महेश जोशी यांची राज्य सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
जालना जिल्हा प्रेस कॉन्सील ऑफ महाराष्ट्रच्या पदाधिकार्यांची निवडणुक वर्षभरापुर्वी पार पडली होती. त्यानिमित्ताने वर्षपुर्ती बैठक युवा आदर्श येथील कार्यालयात पार पडली. यावेळी जालना जिल्हाध्यक्ष दीपक शेळके, उपाध्यक्ष शेख चांद पी.जे., उपाध्यक्ष गणेश काबरा, कार्यकारिणी सदस्य ओमप्रकाश शिंदे, श्रीकिशन झंवर आदींची उपस्थिती होती.
ग्रामीण भागातील पत्रकार हा खर्या अर्थाने वृतपत्रांचा कणा आहे. हे ग्रामीण भागातील पत्रकार अत्यल्प मानधनावर वृत्तपत्रांसाठी बातम्या पुरविण्याचे काम करतात. यातील अनेक पत्रकारांना केवळ पत्रकारितेच्या माध्यमातून उपजिवीका चालविणे अवघड होते. पर्यायाने त्यांना इतर व्यवसायाकडे लक्ष द्यावे लागते. शिवाय अधिस्विकृती पत्रिका ही ग्रामीण भागातील पत्रकारांना वृत्तपत्रांना देणे अवघड होते. मुख्य म्हणजे या ग्रामीण भागातील पत्रकारांना वृत्तपत्र कार्यालयात येण्यासाठी नेहेमीच बसचा उपयोग करावा लागतो. आधिच अल्प मानधन त्यात येण्या-जाण्याचा खर्च याबाबींकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे. त्याकरीता या ग्रामीण भागातील पत्रकारांना जिल्ह्याच्या मुख्यालय ठिकाणी येण्यासाठी मोफत बस प्रवासासाठी बस पास उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी करण्याबाबत बैठकीत सर्वानुमते ठराव घेण्यात आला असून येत्या सोमवार (दि 10) रोजी जिल्हाधिकार्यांमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबतचे निवदेन देण्यात येणार आहे.
गेल्या वर्षभरात झालेल्या कामकाजाचा या बैठकीत आढावा घेण्यात आला. तसेच आगामी दर्पण दिनानिमित्त ( 6 जानेवारी 2023) रोजी वृत्तपत्र क्षेत्रात उल्लेखनिय काम करणार्या पत्रकारांचा गौरव करण्याबरोबरच उत्कृष्ट जिल्हास्तरीय वृत्तपत्र पुरस्कार यावर्षीपासून दिला जाणार आहे. यात जिल्हारत्न पुरस्कार, जालना भूषण पुरस्कार, ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार, सेवाभावी पत्रकार पुरस्कार, उदयोनमुख संपादक, उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार या पुरस्कारांचा समावेश आहे.