मुंबई । कोट्यवधींचा पैसा ओतून विजयादशमीच्या मुहूर्तावर आयोजित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने झालेल्या आर्थिक उलाढालीची चौकशी करा,अशी मागणी इंडिया अगेन्स्ट करप्शनचे (आयएसी) राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी शुक्रवारी केली.
शिवसेनेच्या इतिहासात यंदा पहिल्यांदाच राज्यातील जनतेने दोन वेगवेगळे दसरा मेळावे अनुभवले. पक्षातील फुटीचे प्रकरण सर्वोच्च न्यायालय तसेच केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सुरू आहे.मात्र, असे असताना एवढ्या मोठ्यासंख्येत शक्तीप्रदर्शन करीत पैसांचा चुराडा करणे योग्य नसल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले आहे. हा निधी शेतकरी, गोरगरीब, वंचित आणि बेरोजगारासाठी वापरला असता तर दोन्ही गटाला पुण्य लाभले असते, असे पाटील म्हणाले.
शिंदे गटाने राज्यभरातून बसेस, रेल्वे तसेच काही खाजगी गाड्यांनी लोकांना मुंबईत आणले होते. या लोकांना ते उद्धव ठाकरे यांची सभा ऐकायला जात आहे की एकनाथ शिंदेंची हे सुद्धा माहिती नव्हते. पंरतु, लोकांच्या परिवहन व्यवस्थेसह सभेसाठी शिंदे यांनी कोट्यवधी खर्च केले.त्यांच्याकडे एवढा पैसा कुठून आला? शिंदे यांना एवढी मोठी रक्कम कुणी दिली? याची निष्पक्षपणे चौकशी होणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केला.उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यात लोक मनापासून सामील झाली असली तरी त्यांनी देखील दसरा मेळाव्याच्या खर्चाचा लेखाजोखा सादर करणे आवश्यक असल्याचे पाटील म्हणाले.
शिवसेना कुणाची हा वाद न्यायालयात सुरू आहे.परंतु,आता दोन्ही गटाने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणे थांवबून लोकांची काम करीत जनमानसात नावलौकिक कमवावा, असे आवाहन पाटील यांनी केले आहे. खरी शिवसेना कुणाची? हे लोकांना तुम्हच्या कामातून ठरवून द्या,असे देखील पाटील म्हणाले. पंरतु, हे सर्व होत असताना दसरा मेळाव्यात खर्च करण्यात आलेल्या अफाट धनशक्तीचा स्त्रोत कुठला? हे शोधणे आवश्यक असल्याचे देखील पाटील म्हणाले.