चोरट्यांचा कहर…! चक्क सव्वालाखाचे डीजेचे साहित्य केले लंपास

43

जालना । आजपर्यंत आपण सोने – चांदी, पैसे चोरल्याच्या घटना ऐकल्या आहेत. मात्र, जाफ्राबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथे चोरट्यांनी चोरीच्या नावाखाली कहरच केला आहे. चक्क सव्वालाखाचे डीजेचे साहित्यच चोरट्यांनी लंपास केले आहे. दरम्यान, याबाबत डीजे मालकाच्या फिर्यादीवरून टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जाफ्राबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील पेट्रोलपंपावरून २५ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर दरम्यान अज्ञात चोरट्यांनी डीजेचे साहित्य लंपास केले आहे. डीजे मालक दादाराव मुनेमाणिक (रा. टेंभुर्णी) यांनी तक्रार दिली की, २५ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर दरम्यान त्यांचा डीजे टेंभुर्णी येथील सर्जेराव शिंदे यांचे पेट्रोलपंपावर उभा केला होता. २ लाख १० हजार किमतीचे डीजे व डीजेचे साहित्य असा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. याप्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात डीजेचालकाच्या फिर्यादीवरून कलम ३७९ नुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिंडे हे करीत आहेत.