प्रयोगाशिवाय विज्ञान आंधळे असते-डॉ. रंजन गर्गे ; विज्ञान छंद शिबिराचा आज समारोप

16
जालना | प्रतिनिधी – पुस्तकात शिकवल्या जाणाऱ्या गोष्टी विज्ञान आहे का? पुस्तकातील आणि शिक्षकांनी सांगितलेले खरे मानायचे तर जगात शोध कसे लागल ? या प्रश्नाची उकल करण्यासाठी परीक्षण अर्थात प्रयोगशील राहणे गरजेचे आहे. चंद्रावर जीव आहे की नाही हे महत्त्वाचे नाही, ते शोधणे म्हणजे विज्ञान आहे. प्रयोगशीलता सध्या खालच्या दर्जाची झालेली असून, प्रयोगशीलतेशिवाय विज्ञान आंधळे आहे. ही बाब विचारात घेता प्रत्येकाने प्रयोगशील राहिले पाहिजे, असा सल्ला छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. रंजन गर्गे यांनी आज रविवार दि 28 मे रोजी विद्यार्थ्यांशी  संवाद साधताना दिला.
       जालना एज्युकेशन फाउंडेशन, अगस्त्यय फाउंडेशन आणि मराठी विज्ञान परिषद जालना यांच्या संयुक्त विद्यामाने आठवी, नववी , दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मामा चौकातील विज्ञान शोध वाटीकेत आयोजित विज्ञान छंद शिबिराच्या दुसऱ्या दिवशी “विचार प्रणालीतील बदल” या विषयावरील चर्चासत्रात डॉ. रंजन गर्गे बोलत होते. व्यासपीठावर मुंबई येथील डॉ. जयंत जोशी, जालना एज्युकेशन फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. सुरेश लाहोटी, उपाध्यक्ष सुनील रायठठ्ठा, सचिव सुरेश कुलकर्णी, प्रा. झांझरी, मराठी विज्ञान परिषदेचे जिल्हा सचिव प्रदीप भावठाणकर आदींची उपस्थिती होती. डॉ. गर्गे पुढे म्हणाले की, विज्ञान झपाट्याने पुढे जात आहे. त्यासाठी अशा शिबिराची आवश्यकता आहे. विज्ञान हे अभ्यासक्रम व छंद म्हणून स्वीकारणे यात जमीन आसमानचा फरक आहे. विज्ञान समजून घेण्यासाठी दृष्टिकोन असावा लागतो आणि त्यासाठी शालेय पातळीवरच सजग असले पाहिजे. बदल हा सांगून स्वीकारला जात नसतो. एखादी गोष्ट सवय अथवा नाटक म्हणून स्वीकारणे योग्य नाही. जीवन पद्धती म्हणून विज्ञान स्वीकारायचे असते. आयुष्यात परिश्रम, ज्ञान, प्रेमाची वागणूक, पैसा, नेतृत्व गुण आणि मानसिकता या गोष्टीची सांगड यशापर्यंत घेऊन जाते. विज्ञान जाणून घेण्यासाठी अवतीभोवती बघा. आकाश निळे आहे हे सर्वांना माहीत आहे पण ते निळे का आहे, याच्या खोलात जाणे गरजेचे आहे. आपणास जे दिसते त्याचा छढा लावा आणि मग पुस्तकात जा, असा सल्ला देऊन ते म्हणाले की, ग्रहणाच्या बाबतीत अनेक गैरसमज पसरविले जातात. ग्रहण हा सावल्यांचा खेळ असून त्यात विज्ञान आहे. त्यामुळे ते कोणी पाहावे, कोणी पाहू नये याचे अवडंबर केले जाऊ नये. विवेकाधीष्टीत आणि भावनाधीष्टीत श्रद्धेत फरक आहे. भावनेवर आधारित श्रद्धेत यश मिळत नाही. या उलट विवेकावर आधारित श्रद्धा यशापर्यंत घेऊन जाते. विज्ञान हे जात, पंथ, धर्म असा भेद करत नाही. त्यामुळे प्रत्येकाने विज्ञानावर प्रेम केले पाहिजे. दृष्टिकोन बदलण्यासाठी मनाला ट्रेनिंग देणे गरजेचे आहे; पण ही बाब अवघड आहे. चालता, उठता, बसता, खेळता आपल्या मनात कल्पना येतात. अशावेळी मन बंद करून ठेवले तर कल्पना नष्ट होतात. त्यामुळे मनात आलेली कल्पना लिहून ठेवली पाहिजे. मात्र, आपण असे न करता कल्पनांना ठार मारत आहोत. पृथ्वी गोल आहे का, हे बघायचे असेल तर त्यासाठी अंतराळात जावे लागेल. म्हणजेच मुळाशी जावे लागेल. सत्याचा शोध घेताना विरोध केला जातो. तोपर्यंत आपण सत्याच्या बरेच जवळ गेलेलो असतो. अशावेळी आपल्या ध्येयावर कायम राहिले पाहिजे. कारण कधी कधी वाईट प्रसंगातून चांगल्या गोष्टी घडतात. कोरोनाचे उदाहरण घ्या. संकट ओढवल्याने तात्काळ संशोधन करून लस विकसित करण्यात आली. कोरोनाप्रमाणेच कर्करोगावरही लस तयार होण्याची शक्यता डॉ. गर्गे यांनी व्यक्त केली. विज्ञान एक विचार पद्धती आहे. विज्ञानातील नवनवीन तंत्रज्ञानाचा अंगीकार करायला हवा. मात्र, त्यामागील धोकेही जाणून घेणे गरजेचे आहे. टेस्ट ट्यूब बेबी, ऑप्टिक फायबर, इंडोस्कॉपी यासारखे नवनवीन तंत्रज्ञान आपण सर्वांनी अंगीकारले आहेत. एखादी गोष्ट आपल्याला समजून घ्यायची असेल तर त्या गोष्टीमधलं आपल्याला काही येतं हे सांगण्याचा प्रयत्न न करता समोरच्या व्यक्तीकडून ते समजून घेण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. काहीतरी वेगळे करण्यासाठी विषय निवडा. एखादी अडचण सोडविण्यासाठी कोणाची मदत मागा, ती मागताना लाज बाळगू नका. कारण आयुष्यभर मूर्ख राहण्यापेक्षा काही क्षणासाठी मूर्ख झालेलं बरं असतं. अनेक जण हरलेल्या क्षणाला कवटाळून बसतात, त्यामुळे भविष्यातील उज्वल क्षण हिरावले जातात, असे ते म्हणाले.
     दुपारच्या सत्रात मुंबई येथील डॉ. जयंत जोशी यांचा विज्ञान प्रयोग व अनुभूती हा प्रत्यक्ष प्रयोगाचा कार्यक्रम पार पडला. त्यांनी अनेक प्रयोग विद्यार्थ्यांसमोर सादर करून विद्यार्थ्यांच्या मनात कुतूहल असलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. या शिबिराची सांगता सोमवार दि. 29 मे रोजी होणार आहे.