जालना : जालना जिल्ह्यातील मातीत कस असून उत्तम खेळाडू घडविण्याची ताकद या मातीत आहे. खेळाडूंनी आपली जिद्द व आपला बाणा दाखवून आपल्या जिल्ह्यासह विभाग, राज्याचे नाव देशासह आंतराष्ट्रीय पातळीवर पोहचवावे, असे आवाहन केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले.
जालना जिल्हा क्रीडा संकुलातील क्रीडा सुविधांच्या टप्पा -1 मधील विकसीत करावयाच्या विविध कामांचा भूमिपुजन सोहळा श्री. दानवे यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. सोहळ्यास आमदार कैलास गोरंट्याल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल पाटील, भास्करआबा दानवे, आदिची प्रमुख उपस्थिती होती.
केंद्रीय राज्यमंत्री श्री. दानवे म्हणाले की, राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू तयार करण्यासाठी शासनाकडून खेळाला सातत्याने प्राधान्य देण्यात येते. जिल्ह्यासह तालुकास्तरावर क्रीडा संकुले नव्याने निर्माण करण्यात येत असून भविष्यात यातून उत्तमोत्तम खेळाडू तयार व्हावेत. खरंतर प्रत्येक युवकात एखादा खेळाडू लपलेला असतो. यासाठी क्रीडा विभागाने प्रत्येक विद्यार्थ्यांतील सुप्त गुण ओळखून त्याला चालना देत तो कोणत्या खेळात प्राविण्य मिळवू शकेल, यादृष्टीने खेळाडूंची निर्मिती करावी. पालकांनी देखील आपल्या मुलांना खेळण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. जीवनात शिक्षणाला फार महत्व आहे त्यामुळे खेळाडूंनी शिक्षणाबरोबरच अभ्यासातही सातत्य राखावे व आपल्या जिल्ह्यासह विभाग, राज्याचे नाव देशासह आंतराष्ट्रीय पातळीवर पोहचवावे. चांगल्या प्रशिक्षकांच्या अनुभवाचा लाभ घेवून खेळाडूंनी खेळातील उत्साह नेहमी तेवत ठेवावा. शासकीय नौकरीत खेळाडूंना आरक्षीत जागा उपलब्ध आहेत. त्यामुळे खेळातुनही करियर घडवता येते, असे सांगून क्रीडा विभागाने इनडोअर खेळांसाठी प्रयत्न करावेत. राज्यपातळीवरील विविध खेळाच्या स्पर्धा जालना जिल्ह्यात आयोजित करण्यासाठी प्रयत्न करावेत यासाठी सीएसआर फंडातून निधी उपलब्ध करुन दिला जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागार यांनी प्रास्ताविकात सांगितले की, क्रीडा सुविधात टेनिस कोर्ट-1, सिंथेटिक बॉस्केटबॉल कोर्ट-1, व्हॉलीबॉल मैदान- 1, कबड्डी मैदान-2, खो-खो मैदान-2, सिंथेटिंक स्केटींग रिंग -1, आर्टीफिशियल क्रिकेट टर्फ-1, रिफरबीशमेंट ऑफ एक्झीस्टींग जिम हॉल-1, संरक्षक भिंत, अंतर्गत रस्ते इत्यादी कामांचे अंदाजे रक्कम 2 कोटी 91 लक्ष 45 हजार 681 रूपयांच्या कामाचे भूमिपुजन आज झाले. राज्यात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार करण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हा क्रीडा संकुलाची निर्मिती केली आहे. तरी जिल्ह्यातील खेळाडूंनी क्रिडा संकुलातील सुविधांचा लाभ घेवून राज्यासह राष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवावा, असे आवाहनही त्यांनी केले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन कोनशिलाचे अनावरण करण्यात आले. क्रीडा क्षेत्रातील राष्ट्रीय, राज्यस्तरावरील खेळाडूंसह प्रशिक्षक, क्रीडा संघटक आणि क्रीडा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला. सुत्रसंचालन प्रशांत नवगिरे यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी रेखा परदेसी, संतोष वाबळे, महमंद शेख यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास खेळाडूंसह क्रीडा प्रेमी, नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.