विज्ञान छंद शिबिराला जालन्यात सुरुवात; पायाभूत विज्ञानाशिवाय संशोधन अशक्य- रायठठ्ठा

28

विज्ञान शोध वाटिका शिक्षण क्षेत्रातील ज्ञानगंगा बनेल- सौ. धूपे

जालना | प्रतिनिधी – जालना एज्युकेशन फाउंडेशन, अगस्त्य फाउंडेशन आणि मराठी विज्ञान परिषद जालना यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित तीन दिवसीय विज्ञान छंद शिबिराला आज शनिवार दि. 27 मे रोजी मामा चौकातील क्रिस्टल बिझनेस सेंटरमधीलमधील विज्ञान शोधवाटीकेत सुरुवात झाली. जालना एज्युकेशन फाउंडेशनच्यावतीने जुलैपासून विज्ञान शोधवाटिका (सायन्स सेंटर) सुरू होत आहे. तत्पूर्वी या शोधवाटिकेत आयोजित शालेय अभ्यासक्रमासह इतर दैनंदिन जीवनातील वैज्ञानिक तत्वांची साध्या आणि सोप्या भाषेतून मांडणी तसेच प्रत्यक्ष प्रयोगांची धम्माल व आकाश दर्शनाचा समावेश असलेल्या विज्ञान छंद शिबिराचा शुभारंभ शिक्षणाधिकारी मंगलताई धुपे यांच्याहस्ते झाला. व्यासपीठावर जेईएस महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य डाॅ. रमेश अग्रवाल, उपशिक्षणाधिकारी रवी जोशी, उद्योजक आशिष मंत्री, विजयकुमार कागलीवाल, योगेश पाटणी, शंकर शर्मा, प्रा. भंडारी, डाॅ. महेन्द्र करवा, उद्योजक शिवरतन मुंदडा, उदय शिंदे, विज्ञान प्रसारक संजय टिकारिया, प्रकाशभाई मेहता, जालना एज्युकेशन फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. सुरेश लाहोटी, उपाध्यक्ष सुनील रायठठ्ठा, सहसचिव सुरेश कुलकर्णी, प्रा. डाॅ. कागणे, प्रा. ब्रिजमोहन देवीदान, प्रा. झांझरी आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविकपर भाषणात प्रा. सुरेश लाहोटी म्हणाले की, विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा, या उद्देशाने विज्ञान शोधवाटिका आम्ही सुरू करत आहोत. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना या शोधवाटिकेत वर्षातून 20 वेळेस प्रयोग करायला मिळणार आहेत. तसेच त्यांना घरी करण्यासाठी एक प्रकल्पही दिला जाईल. किमान 1 हजार विद्यार्थ्यांना या प्रयोगशाळेचा लाभ होणार असून, जुलैपासून प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. वर्षाला तीन ते चार विज्ञान शिबिर घेऊन जनजागृती केली जाणार आहे. आज छोट्या स्वरूपातील हे सेंटर भविष्यात मोठ्या सेंटरमध्ये रूपांतरित होईल, असे ते म्हणाले. ‘चला आपणच प्रयोग करूया’ या सत्रात विज्ञान प्रसारक संजय टिकारिया यांनी अनेक प्रयोग करून दाखवले आणि विद्यार्थ्यांकडून करवून घेतले. ते म्हणाले की, साध्या साहित्यातूनही प्रयोगाची निर्मिती करता येते आणि प्रयोगातूनच विज्ञान शिकता येते. विद्यार्थ्यात वैज्ञानिक जाणीवा आणि दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी सर्वजण प्रयत्न करतात. मात्र, बेसिक सायन्ससाठी पुरेसे प्रयत्न होत नाहीत. खरे तर बेसिक सायन्स पाचवी, सहावीच्या पुस्तकातच दडलेले आहे. प्रत्येक विद्यार्थ्याची एक छोटीशी प्रयोगशाळा असायला हवी. त्यासाठी बाजारातून साहित्य खरेदी करण्याची गरज नाही. घरगुती साहित्यातूनच ती निर्माण करता येते. विज्ञानाच्या संकल्पनाच कळाल्या नाही तर विद्यार्थी पोपटपंची बनतो. जगातील कोणत्याही अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यात विज्ञान संकल्पना स्पष्ट नसतील ते काहीच करू शकणार नाहीत, असे ते म्हणाले. तिसऱ्या सत्रात जेईएस महाविद्यालयाचे वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. जी. बी. कुलकर्णी यांनी वनस्पतीशास्त्र : प्रयोग व आकलन या विषयावर मार्गदर्शन केले. सायंकाळी 5 वाजता जेईएस महाविद्यालयात सूर्यमाला व अंतराळाची सफर या विषयावर डॉ. श्रीनिवास औंधकर यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आकाश दर्शनाचा आनंद लुटला. या शिबिरात शंभर विद्यार्थी सहभागी झाले असून, 29 मे पर्यंत शिबिर चालणार आहे