जालना | प्रतिनिधी – उज्वल बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने दि. 28 मे 2023 रोजी सकाळी 10 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, जुना जालना येथे हिरकणी महोत्सव व हिरकणी पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या निमित्त महिलांना भरगच्च कार्यक्रमाची मेजवानी मिळणार आहे. महिलांसाठी खास प्रबोधनात्मक सांस्कृतीक कार्यक्रमासह मोफत आरोग्य तपासणी व सर्वरोग निदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
सामाजिक हिताच्या दृष्टीकोणातून महिलांच्या न्याय हक्कासाठी तसेच महिला सक्षमीकरण करुन त्यांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी संस्थेच्या वतीने नेहमीच विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. त्याच प्रमाणे या वर्षी हिरकणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून आ. कैलास गोरंट्याल तर अध्यक्ष म्हणून प्रसिध्द उद्योजक सामाजसेवक सुनिलभाई रायठ्ठा यांची उपस्थिती राहणार आहे. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मिना तर प्रमुख पाहुने म्हणून सहाय्यक आयुक्त अमित घवले, उद्योजक घनशासमदास गोयल, मुख्याधिकारी संतोष खांडेकर, अॅड. अश्विनी धन्नावत, सामाजिक कार्यकर्त्या रसना देहेडकर, स.पो.नि. अर्चना पाटील यांची उपस्थिती राहणार आहे.
यावेळी छोट्या पडद्यावर आपल्या जादूई आवाजाने आख्या महाराष्ट्राला भुरळ घालणारा टीव्ही स्टार शाहीर रामानंद उगले यांचा खास सांस्कृतीक आणि पोवाड्याचा कार्यक्रम होणार आहे. तसेच महिला सर्पमित्र प्रतिभा ठाकरे यांचा साप आणि माणूस या विषयावर प्रबोधनात्मक कार्यक्रम होणार आहे. महिलांना करणी आणि भानामती केल्याचे भासवून लुट करण्यात येते. परंतु, अशा प्रसंगातून महिलांनी सुरक्षीत कसे राहीले पाहिजे यावर अंधश्रध्दा निर्मुलन कार्यशाळेचे देखील आयोजन करण्यात आले आहे. एकल महिला किंवा ज्या मुलांना आई किंवा वडील नाहीत अशा मुलांसाठी महिला व बालकल्याण विभागाच्या योजनेचे अर्ज देखील कार्यक्रमाच्या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमास जिल्ह्यातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सौ. करुणा मोरे, सौ. संगीता ढेरे, सौ. रोहीणी बळप, सौ. सविता काळे यांच्यासह पदाधिकार्यांनी केले आहे.