औरंगाबाद : राज्यातील शेती आणि शेतकरी हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. याचाच प्रत्यय आज कन्नड येथील कार्यक्रमात उपस्थितांना आला. राज्यातील शेतकऱ्यांसाठी विविध हिताचे निर्णय मुख्यमंत्र्यानी घेतले आहे. कधी शेतीच्या बांधावर जात पिकाची पाहणी करणे असो किंवा गारपीट व अवकाळीमुळे हतबल झालेल्या शेतकरी बांधवांना दिलेला मदतीचा हात आणि आधार असो, हे नेहमीच त्यांच्या कर्तव्यदक्षतेने व तळमळीने काम करण्याच्या शैलीतून दिसून येते.
मुख्यमंत्री असूनदेखील ते एक शेतकरी असल्याचा प्रत्यक्ष अनुभव स्वत: लाभार्थ्यांसाठी ट्रॅक्टर आणि कम्बाईंड हार्वेस्टर वाटपाच्या वेळी आला. पीक काढणीसाठी वापरण्यात येणाऱ्या हार्वेस्टरची माहिती घेऊन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी जवळपास ५०० मीटर ट्रॅक्टर आणि हार्वेस्टर चालवले. हा क्षण लाभार्थ्यांसाठी खऱ्या अर्थाने सुखद ठरला. त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना ट्रॅक्टरच्या चाव्या सुपूर्द केल्या.
आपुलकीची भावना, शेतकरी, कष्टकरी यांच्याप्रति असलेला जिव्हाळा आणि त्यांच्या हितासाठी मुख्यमंत्री म्हणून जे काही करता येईल, ते करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांच्या निर्णयातून दिसतो.