जाफराबाद | प्रतिनिधी – जाफराबाद तालुक्यातील पिंपळखुटा येथील सागर रामराव भालके व भोकरदन तालुक्यातील रुपाली रंगनाथ पांडे यांनी अनेक पारंपरिक धर्मरूढीला फाटा देत शिवविवाह पद्धतीने विवाह केला. वर सागर हे मराठा सेवा संघाच्या विचाराने प्रेरित झालेले असल्याने त्यांनी स्वतःचा विवाह हा या पद्धतीने करण्याचे मनात ठरविले होते. या विवाहाची सुरवात छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमा पूजन करून करण्यात आली. पारंपरिक पद्धतीने शाल, श्रीफळ, रुमाल देवून सत्कार न करता आलेल्या प्रुमख पाहुण्यांचे सत्कार हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन चरित्र असलेले “शिवाजी कोण होता” हे पुस्तक देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. वर सागर व वधू रुपाली यांना सर्वांच्या समोर शिव शपथ देण्यात आली. त्याचबरोबर लग्नात सर्वत्र वापरल्या जाणाऱ्या ज्वारी व तांदूळ या धान्यापासून बनविलेल्या अक्षदा न वापरता शेतकऱ्यांनी शेतात पिकविलेल्या झेंडूची फुलांच्या पाकळ्या अक्षदा म्हणून वापरण्यात आला. शिववीवाह का करावा ही भूमिका यावेळी रामेश्वर तिरमुखे यांनी उपस्थित समाज बांधवांना समजावून सांगितली. मंगलअष्टके म्हणून लग्न न लावता शिवपंचक व जिजाऊ वंदना म्हणून हे लग्न लावण्यात आले. यावेळी जाफराबाद व भोकरदन तालुक्यातील सामाजिक, राजकीय, कृषी, शैक्षणिक क्षेत्रातील नागरिक व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मराठा समाजातील दिवसेंदिवस लग्न समारंभातील वाढत चाललेल्या रूढी परंपरेला फाटा देवुन काळाची गरज ओळखुन सामाजिक भान ठेवत ची. सागर यांनी “शिवविवाह” पद्धतीने केलेल्या विवाहाचे व भालके परिवाराचे सर्वांनी कौतुक केले.
नवरदेवाकडून जिजाऊ सृष्टीसाठी अकरा हजार रुपये….
या लग्नातील ची. सागर यांच्या कुटुंबियांच्या वतीने सामाजिक भान ठेवून जिजाऊ सृष्टीसाठी अकरा हजार रुपयाचा धनादेश मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष उमेश दूनगहु यांच्या कडे सुपूर्द करण्यात आला.