राज्यस्तरीय दिव्यांग मार्गदर्शन मेळाव्यात विविध विषयांवर विचारमंथन; दिव्यांगांच्या समस्या, अडचणीवर निश्चितच मार्ग काढणार-खोतकर

8
जालना | प्रतिनिधी – दिव्यांगांच्या ज्या काही अडचणी असतील त्या निसंकोचपणे आपल्याकडे मांडाव्यात, सरकारच्या माध्यमातून अडचणी आणि समस्यांवर मार्ग काढण्याचा निश्चितच प्रयत्न करू, अशी ग्वाही माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी येथे दिली. संघर्ष दिव्यांग सामाजिक संघटनेच्यावतीने शुक्रवार दि. 19 मे रोजी कचेरी रोडवरील मुक्तेश्वर मंगल कार्यालयात आयोजित राज्यस्तरीय दिव्यांग मार्गदर्शन मेळाव्यात उद्घाटक म्हणून श्री. खोतकर बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे जिल्हा संपर्क उपनेते पंडितराव भुतेकर, जालना तालुकाप्रमुख संतोषराव मोहिते, भाजपाचे शहर अध्यक्ष राजेश राऊत, शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णू पाचफुले, समाज कल्याणच्या समतादूत सौ. सुरेखाताई बोर्डे, औरंगाबाद येथील लोक निर्माण ग्रामीण विकास व संशोधन संस्थेच्या अध्यक्ष डॉ. कु. अर्चनाताई मेढेवार यांची तर व्यासपीठावर संघर्ष दिव्यांग सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल मगदूले, सोशल मीडिया अध्यक्ष राहुल मुळे, उपाध्यक्ष रवी तायडे, शहराध्यक्ष दशरथ तोंडूळे, शहर सचिव शेख इस्माईल, तालुका अध्यक्ष सिद्धार्थ काळेबाग आदींची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना अर्जुनराव खोतकर म्हणाले की, दिव्यांगांकडे कुणीही वेगळ्या दृष्टीने बघू नये. त्यांच्याशी कोणताही भेद करू नये. दिव्यांगांसाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. त्याचा लाभ घ्यावा. प्रशासकीय पातळीवर कोठे अडवणूक होत असेल तर आपल्याशी संपर्क साधावा. सरकार दिव्यांगांसाठीही अनेक योजना प्रभावीपणे राबवित आहेत. समाज कल्याण विभागात याबाबत माहिती उपलब्ध आहे. आज जालन्यात पहिला राज्यस्तरीय दिव्यांग मार्गदर्शन मेळावा होत आहे या माध्यमातून अनेक प्रश्न आणि समस्या मार्गी लागतील असा विश्वास श्री. खोतकर यांनी व्यक्त केला. विष्णू पाचफुले म्हणाले की, व्यंग निर्माण होणे हा काही कुणाचा दोष नसतो. दिव्यांगांना सर्वांनीच मदतीचा हात देण्याची गरज असून,  अर्जुनराव खोतकर दिव्यांगांच्या समस्या सोडविण्यासाठी निश्चितच पाठपुरावा करतील असे सांगून त्यांनी अशा प्रकारचे मार्गदर्शन मिळावे प्रत्येक जिल्ह्यात आयोजित करून दिव्यांगांचे प्रश्न मार्गी लावावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. समाज कल्याण च्या समतादूत सौ. सुरेखाताई बोर्डे म्हणाल्या की, दिव्यांगांसाठी अनेक सवलती आणि योजना आहेत. त्यांच्यासाठी विशेष आर्थिक सहाय्य दिले जाते. रिकामा प्लॉटवर बांधकामासाठी सबसिडी, कमी व्याज दारावर कर्ज दिले जाते तसेच व्यवसाय उभारणीसाठी विशेष प्रशिक्षण देऊन अर्थसहाय्य केले जाते. डॉ. कु. अर्चनाताई मेढेवार म्हणाल्या की, दिव्यांग आणि समाज कल्याण विभागातून विविध योजनांची माहिती मिळवावी. घर बांधणी अथवा प्लॉटवर बांधकामासाठी दोन लाख 65 हजारपर्यंत अर्थसहाय्य केले जाते. अनेक योजनांची माहिती नसल्याने दिव्यांग वंचित राहतात. विविध योजनाबाबत संघर्ष सामाजिक दिव्यांग संघटनेच्यावतीने जनजागृती करण्यात यावी, असे त्या म्हणाल्या. प्रारंभी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल मगदूले यांनी दिव्यांगांच्या समस्या आणि अडचणी विशद करून प्रशासन अडवणूक करत असल्याची बाब निदर्शनास आणून दिली. राज्यभर अशा प्रकारचे मिळावे जिल्हास्तरावर घेतले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. प्रास्ताविकपर भाषणात संघटनेचे सोशल मीडिया प्रमुख राहुल मुळे म्हणाले की, प्रशासकीय पातळीवर दिव्यांगाच्या बाबतीत अनास्था दाखवली जात असल्याने त्यांना विविध योजनांपासून वंचित राहावे लागते. अधिकारी व कर्मचारी टोलवाटोलवी करतात. यावर आवाज उठवण्यासाठीच राज्यस्तरीय दिव्यांग मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला आहे. एसटी महामंडळप्रमाणेच वन फोरच्या धर्तीवर रेल्वेनेही दिव्यांगांना सरसकट प्रवास सवलत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. गावात एक ठराव घेण्यात येऊन मागण्या मांडण्यात आल्या. मेळाव्याला राज्यभरातील दिव्यांग मोठ्या संख्येने उपस्थित होते.