भोकरदन येथे भारत फायनान्स शाखेचा कॅशियर ११ लाख घेऊन पळाला, रक्कम बॅंकेत जमा करण्यासाठी गेला अन् परतलाच नाही…

88
भोकरदन  | प्रतिनिधी- भोकरदनच्या भारत फायनान्स शाखेचा कॅशियर ११ लाख घेऊन पळाला. महिला बचतगटाची रक्कम बॅंकेत जमा करण्यासाठी गेला अन् परतलाच नाही. यानंतर शाखा व्यवस्थापकाने अनेक फोन केले. मात्र, त्याने फोन उचललाच नाही. यामुळे भोकरदन येथील भारत फायनान्स शाखेच्या व्यवस्थापकाने पोलिस ठाणे गाठून हकिकत सांगितली आहे. सुधाकर यादव अपुलवार (रा. बितमाळ ता. उमरी, जि नांदेड) असे आरोपीचे नाव आहे. कृष्णा वसंत जाधव (वय ३० वर्षे, व्यवसाय खाजगी नौकरी, ब्रांच मॅनेजर, भारत फायनायन्स,  रा. लक्ष्मीनगर भोकरदन, ता. भोकरदन, जि. जालना) यांनी या प्रकरणी पोलिसांना प्राथमिक माहिती दिली.  कृष्णा वसंत जाधव हे भोकरदन येथील भारत फायनायन्समध्ये ब्रांच मँनेजर या पदावर कार्यरत आहे. त्यांच्या सोबत सुधाकर यादव अपुलवार हा कॅशीयर म्हणून काम करतो. अन्य सहकारीही या शाखेत काम करतात. शाखा व्यवस्थाप कृष्णा जाधव यांनी पोलिसांना दिलेली माहिती अशी की, बुधवारी (दि.१७) सकाळी ७ वाजता नेहमीप्रमाणे ते त्यांच्या कार्यालयाच्या ठिकाणी भारत फायनान्स भोकरदन येथे आले. सकाळी आठ वाजेच्या सुमारास शाखेतील अन्य सहकारी हे वेगवेगळ्या खेडेगावाला बचतगटाचे हाप्ते वसुल करण्यासाठी निघून गेले होते. भोकरदनच्या भारत फायनायन्सकडे दररोज महिला बचतगटाचे पैसे जमा होतात.  बुधवारी (दि.१७) रोजी भारत फायनायन्समध्ये काही ठेव व वाटप करण्याची रक्कम जमा होती. सकाळी जाताना शाखा व्यवस्थाप कृष्णा जाधव यांनी सोबत काम करणारा सुधाकर यादव अपुलवार (रा. बितमाळ ता. उमरी, जि नांदेड) यांना सांगितले होते की, ही बचत गटाची जमा असलेली रक्कम तू बँकेत जावून जमा करून ये. बचत ठेवीचे पैसे जमा करणेसाठी नेहमी सुधाकर बँकेत जात असे. त्यामुळे शाखा व्यवस्थापक कृष्णा जाधव यांनी जमा असालेले ११ लाख ५१ हजार ५६० रुपये सुधाकरकडे दिले व लोनसाठी कोणी सभासद आल्यास त्यांना कर्जाचे वाटप करा व शिल्लक पैसे बँकेत जामा करा, असे सुधाकर यांना सांगून शाखा व्यवस्थापक कृष्णा जाधव हे वसुलीसाठी वालसावंगी येथे निघून गेल्याचे सांगण्यात आले.