प्रधानमंत्र्यांच्या हस्ते ५,८०० कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध वैज्ञानिक प्रकल्पांची पायाभरणी व लोकार्पण; महाराष्ट्रातील प्रकल्पांचाही समावेश

13

नवी दिल्ली : राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते  वैज्ञानिक  आणि तांत्रिक प्रगतीशी संबंधित 5,800 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण करण्यात आले. यात महाराष्ट्रात असणाऱ्या प्रकल्पांचा समावेश आहे.

येथील प्रगती मैदानामध्ये राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रधानमंत्री श्री मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्तीवेतन राज्यमंत्री जितेंद्र सिंह आणि इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

ज्या प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली त्यामध्ये लेझर इंटरफेरोमीटर गुरुत्वीय लहरी वेधशाळा लिगो-इंडिया (LIGO-India), हिंगोली, टाटा मेमोरियल रुग्णालय, मुंबईचा प्लॅटिनम ज्युबिली ब्लॉक या महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांचा समावेश आहे.

राष्ट्राला समर्पित केलेल्या प्रकल्पांमध्ये मुंबई येथील फिशन मॉलिब्डेनम-99 उत्पादन सुविधा तसेच नवी मुंबई येथील नॅशनल हॅड्रॉन बीम थेरपी सुविधा, रेडिओलॉजिकल रिसर्च युनिट, तसेच महिला आणि लहान मुलांच्या  कर्करोग रुग्णालयाची  इमारत  यांचा समावेश आहे. या कार्यक्रमादरम्यान, प्रधानमंत्री यांनी भारतामध्ये अलिकडच्या काळात झालेल्या विज्ञान आणि तंत्रज्ञानविषयक  प्रगतीचे दर्शन घडवणाऱ्या प्रदर्शनाचे उद्घाटन केले तसेच  स्मरणार्थ टपाल तिकीट आणि नाणेही जारी केले.

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी 1999 मध्ये भारताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीसाठी योगदान देणाऱ्या  आणि मे 1998 मध्ये पोखरण चाचणी  यशस्वीपणे पार पाडणाऱ्या भारतीय शास्त्रज्ञ, अभियंते आणि तंत्रज्ञांच्या सन्मानार्थ ‘राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन’ साजरा करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून, राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस दरवर्षी 11 मे रोजी साजरा केला जातो. दरवर्षी हा दिवस नवीन आणि वेगळ्या संकल्पनेसह साजरा केला जातो. या वर्षीची संकल्पना ‘स्कूल टू स्टार्टअप्स- इग्नाइटिंग यंग माइंड्स टू इनोव्हेट’ अशी आहे.

पार्श्वभूमी

महाराष्ट्रात हिंगोली येथे लिगो-इंडिया  (LIGO-India)  विकसित केले जाणार असून  जगातील निवडक लेझर इंटरफेरोमीटर गुरुत्वीय लहरी वेधशाळांपैकी ते एक असेल. या परिसरातील 4 किमी लांबीची ‘भूजा’  असलेले अत्यंत संवेदनशील इंटरफेरोमीटर असून कृष्णविवर आणि न्यूट्रॉन तारे यांसारख्या प्रचंड खगोल भौतिक वस्तूंच्या विलीनीकरणादरम्यान निर्माण झालेल्या गुरुत्वीय लहरी समजून घेण्यास सक्षम  असणार आहे. अमेरिकेत हॅनफोर्ड, वॉशिंग्टन येथील एक आणि लिव्हिंग्स्टन, लुईझियाना येथील एक अशा दोन वेधशाळांबरोबर लिगो-इंडिया   ( LIGO-India) समन्वयाने  कार्य करेल.

नवी मुंबईतील टाटा मेमोरियल सेंटरची  नॅशनल हॅड्रॉन बीम उपचार सुविधा ही एक अत्याधुनिक सुविधा आहे.  शरीरात मात्रेची व्याप्ती गाठीच्या आजूबाजूच्या निरोगी अवयवांपर्यंत कमीतकमी ठेवत गाठीवर  अत्यंत अचूक रेडिएशनचे वितरण करण्याचे कार्य या सुविधेमुळे शक्य होते.लक्ष्यित ऊतींना मात्रेचे अचूक वितरण करत  रेडिएशन उपचाराचे प्रारंभिक आणि दीर्घकालीन  दुष्परिणाम कमी करते.

भाभा अणु संशोधन केंद्राच्या ट्रॉम्बे परिसरात  फिशन मॉलिब्डेनम-99 उत्पादन सुविधा आहे.  मॉलिब्डेनम-99  हे टेक्नेटियम-99एम चे मूळ आहे. त्याचा  उपयोग  कर्करोग, हृदयरोग इत्यादी व्याधींचे निदान लवकर करण्यासाठी आवश्यक 85% पेक्षा जास्त इमेजिंग प्रक्रियेमध्ये होतो. या  सुविधेमुळे प्रतिवर्षी सुमारे 9 ते 10 लाख रुग्णांचे परीक्षण शक्य होणे अपेक्षित आहे.

कर्करोग रुग्णालयांचे आणि  सुविधांचे  राष्ट्रार्पण  आणि पायाभरणी यामुळे देशाच्या विविध भागांमध्ये  कर्करोगावरील  जागतिक दर्जाच्या  सेवांचे  विकेंद्रीकरण होईल आणि त्याची व्याप्ती वाढेल.