आता शेतकरी करतील कापूस गाठींची ऑनलाइन विक्री

13

जालना । प्रतिनिधी – कृषी विभागाच्या आत्मा मार्फत मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्प जालना जिल्ह्यात सुरू झाला असून शेतमालाला भाव नसणे, शेतमालाचे भाव स्वत: ठरवण्याचे अधिकार नसणे, बाजारपेठ व्यापार्‍यांच्या हाती असणे आदी कारणांमुळे शेतकरी कायम नागवला गेला. मात्र, यापुढे कापूस उत्पादक शेतकरी थेट ऑनलाइन विक्री करू शकणार आहे. स्मार्ट कॉटन’ प्रकल्पातंर्गत शेतकर्‍याला बाजारभावानुसार गाठींची विक्री करण्यात येईल, अशी माहिती पुरवठा व मूल्य साखळी तज्ञ श्री कैलाश राजबिंडे यांनी दिली.
प्रकल्पांतर्गत शेतकरी ते कापड उद्योजकांपर्यंत थेट साखळी राहील. यासाठी जालना , घनसावंगी , बदनापूर व भोकरदन शेतकर्‍यांना शिवार फेरीसह प्रशिक्षणही देण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली आहे,कृषी विभागासह महाराष्ट्र कापूस पणन महासंघ महाकॉट, महिला आर्थिक विकास महामंडळ, ग्राम सामाजिक परिवर्तन फाउंडेशन, महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचाही प्रकल्पात समावेश आहे. लागवडीपासून वेचणीपर्यंतचे प्रशिक्षण : हेक्टरी उत्पादकता वाढवून गुणवत्तापूर्ण उत्पादन घेणे आणि कापसाच्या मूल्य साखळीत शेतकर्‍यांचा सहभाग  वाढवणे हा स्मार्ट कॉटन प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे
शेतकर्‍यांचे जवळच्या जिनिंग मिलसोबत करार करण्यात येणार आहेत एका गावात 200 एकर कापसाचे क्षेत्र असलेले 100 शेतकरी गटांमध्ये निवड करून त्यातून एक शेतकरी गट प्रमुख म्हणून काम करणार आहे. हे सर्व शेतकरी एकाच वाणाची लागवड करतील. लागवडीपासून ते वेचणीपर्यंत वेगवेगळ्या स्तरावर शेतकर्‍यांना गटप्रमुखांमार्फत सूचना व प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
कृषी विभागावर मार्गदर्शनाची जबाबदारी : या प्रकल्पात शेतकर्‍यांना लागवड ते काढणीपर्यंत मार्गदर्शन करण्याची जबाबदारी कृषी विभागाकडे देण्यात आली आहे. प्रत्येक जमिनीचा पोत, कस, उगवण क्षमता वेगवेगळी असते. त्यानुसार शेतकर्‍यांना मार्गदर्शन करणार.
दलालमुक्त ऑनलाइन विक्री
सर्व शेतकरी गटांची पणन महासंघाकडे रीतसर नोंदणी केली जाईल. शेतकरी गटाने तयार केलेल्या गाठींची संपूर्ण माहिती ऑनलाइन पोर्टलवर टाकण्यात येणार आहे. त्यात धाग्याची लांबी, शुद्धता, कापूस व गाठी कोणत्या शेतकरी उत्पादक गटाचा आहे, याची माहिती राहिल. त्यानंतर खरेदीदार थेट शेतकरी उत्पादकांकडून कापूस विकत घेऊ शकेल,
ब्रँडिंग करून विकणार कापूस
मानकानुसार कापसात तंतूचे प्रमाण 43 ते 44 टक्के हवे. आपल्याकडे ते 33 ते 44 टक्के आहे. आंतरराष्ट्रीय मानकानुसार उत्पादन घेण्यासाठी कापूस उत्पादक शेतकर्‍यांचे प्रदेशनिहाय गट तयार करण्यात आले आहेत. या गटांना काडी कचरा व भेसळविरहित कापूस कसा घ्यावा याविषयी सांगण्यात येईल. स्मार्ट कॉटन ब्रँडखाली कापूस व गाठींची विक्री करण्यात येईल.