वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने व्यापार ठप्प – पंच, व्यापारी महासंघाचे शिष्टमंडळ महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यास भेटले

23

जालना । प्रतिनिधी – जालना शहरात वारंवार खंडित होत असलेल्या पुरवठ्यामुळे नागरिक आणि व्यापारी त्रस्त असून, व्यापार ठप्प होत आहे. ही बाब विचारात घेता, विजपुरवठा ठेवावा अशी अशी मागणी व्यापार्‍यांच्या शिष्टमंडळाने महावितरणचे अधीक्षक अभियंता संजय सारंग यांची भेट घेऊन त्यांच्याकडे केली.
जालना व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सतीश पंच आणि ग्रामीण जिल्हाध्यक्ष हस्तीमल बंब यांच्या नेतृत्वाखालील व्यापार्‍यांच्या या शिष्टमंडळात कार्याध्यक्ष दीपक भुरेवाल, योगेश ठक्कर, विनय गेही, मुकेश परमार आदींचा समावेश होता. यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संपुर्ण भारतात जालना शहर हे व्यापार्‍यांचे शहर म्हणुन प्रसिध्द आहे. सध्या सर्वत्र लग्नसराईचा हंगाम चालु आहे. त्यामुळे शहरातील तसेच परिसरातील ग्रामीण भागातील ग्राहक शहरातील नेहरू रोड, काद्राबाद, सुभाष रोड, जुना मोंढा, जिंदल मार्केट व इतर व्यावसायिक प्रतिष्ठानात खरेदीसाठी मोठया संख्येने येत आहेत. सध्या उन्हाळयाचे दिवस असल्याने तापमानातही वाढ होत असून, उकाडा मोठया प्रमाणात होत आहे. शहरातील वीज पुरवठा वांरवार खंडीत होत असल्याने त्याचा सर्वाधिक परिणाम व्यापारावर होत आहे. खंडित वीजपुरवठ्याचा त्रास सर्वसामान्य नागरीक, ग्राहक व व्यापा-यांना होत आहे. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी आपल्या कार्यालयातील टेलीफोन क्रमांक व मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला असता, फोन उचलत नाही व मोबाईल स्वीच ऑफ येतात. तसेच कार्यालयात प्रत्यक्ष आल्यास तेथे कोणताही कर्मचारी आढळून येत नाही. या प्रश्नाकडे व्यक्तीशः लक्ष देवुन शहरातील वीज पुरवठा वारंवार खंडीत होणार नाही याकरीता संबंधीतांना आदेश द्यावे; नसता आम्हास व्यापार बंद ठेवावा लागेल व याचा परिणाम शासनाच्या उत्पन्नावर होईल, असे निवेदनाच्या शेवटी नमूद करण्यात आले आहे.
अन्यथा व्यापार बंद ठेवावा लागेल – बंब
विज पुरवठा खंडित झाल्यास संगणक चालत नाही, त्यामुळे बिले काढता येत नाही. उकाड्यामुळे ग्राहक जास्त थांबत नाहीत. अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास व्यापार बंद ठेवण्याशिवाय आमच्यासमोर पर्याय उरलेला नाही. ही बाब विचारात घेता तात्काळ दाखल घ्यावी अशी मागणी व्यापारी महासंघाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष हस्तीमल बंब यांनी केली आहे.