परतूर येथे पत्रकारांसाठी कायदेविषयक साक्षरता या विषयावर कार्यशाळा संपन्न

6

जालना । प्रतिनिधी – मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त परतूर येथे आज माध्यम प्रतिनिधींसाठी कायदेविषयक साक्षरतेची कार्यशाळा व राज्यघटनेतील मुल्यांची ओळख या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली.
परतूर येथील लॉयन्स क्लब सभागृहात जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने आयोजित या कार्यशाळेस वकील संघाचे अध्यक्ष तथा कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक ड. अभय जवळेकर, ड. टी. बी. मगर, प्रा. सिद्धार्थ पानवाले, जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे, ज्येष्ठ पत्रकार राजकुमार भारुका व मुन्ना चितोडा, जिल्हा माहिती कार्यालयाचे अनिल परेदशी यांच्यासह मोठया संख्येने पत्रकार उपस्थित होते.
प्रमुख मार्गदर्शक अ‍ॅड. जवळेकर म्हणाले की, भारतीय राज्यघटना देशाचा अभिमान आहे. आपल्या संविधानात सजग कायदे करण्यात आले आहेत. पत्रकार संरक्षण कायद्यानुसार पत्रकारांना सुरक्षा कवच प्रदान करण्यात आले आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात पत्रकारांच्या लेखणीचे महत्व अतिशय कौतुकास्पद व अतुलनीय होते, असे सांगून त्यांनी भारतीय राज्यघटनेतील मूल्यांची ओळख करून दिली.
अ‍ॅड. मगर म्हणाले की, सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करणार्‍या पत्रकारांना संरक्षण असले पाहिजे, या उद्दात्त हेतूने आणि पत्रकारावर होणार्‍या हल्ल्यापासून बचावासाठी पत्रकार संरक्षण कायदा महाराष्ट्रात प्रथम वेळी मंजूर करण्यात आला. पत्रकार संरक्षण कायद्यातून पत्रकारांना सुरक्षा कवच प्रदान करण्यात आले आहे. एखाद्या पत्रकारावर हल्ला झाला तर आरोपीला किमान 3 वर्षे शिक्षा व 50 हजार रुपये दंड अशी तरतूद आहे. तसेच हा अजामीनपात्र गुन्हा आहे. या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाल्यास पोलिस उपअधीक्षक पदाच्या दर्जापेक्षा कमी दर्जाचा पोलिस अधिकारी तपास करू शकत नाही. पत्रकारांना निर्भीडपणे पत्रकारिता करता येण्यासाठी या कायद्याने संरक्षण प्राप्त झाले आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारीतेकडे पाहिले जाते. पत्रकारांनी बातमीचे लिखाण करीत असताना सजगता बाळगणे महत्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रा. पानवाले म्हणाले की, आपल्या देशात विविध जाती, धर्म व पंथांचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. सर्व जाती-धर्मांचे अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी संविधानाची भूमिका अत्यंत मोलाची आहे. पत्रकार हे नेहमीच आपल्या लिखाणातून देश व समाजासाठी बहुमूल्य कार्य करत असतात. देशातील पत्रकार निर्भीड असला पाहिजे, त्यासाठी पत्रकारांच्या जीविताचे रक्षण पत्रकार संरक्षण कायद्यान्वये करण्यात आले आहे. सद्याच्या काळात ज्या व्यक्तीला भारतीय संविधानाची ओळख आहे, त्या व्यक्तीला खरे साक्षर म्हणावे, अशी संकल्पनाही त्यांनी यावेळी मांडली.
प्रास्ताविकात जिल्हा माहिती अधिकारी श्री. धोंगडे यांनी आयोजित कार्यशाळेमागील महत्त्व विषद करत शासनस्तरावर पत्रकारांच्या कल्याणासाठी शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी, आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना यासह पत्रकारांसाठी असणार्‍या शासकीय सोयी-सुविधा आणि सेवांची सविस्तर माहिती दिली. सूत्रसंचालन अजय देसाई यांनी केले तर आभार जिल्हा माहिती कार्यालयाचे मिलिंद तुपसमिंद्रे यांनी मानले. कार्यशाळेस मुद्रित व दृकश्राव्य माध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.